

पुणे : इंडीगोच्या गोंधळामुळे पुणे विमानतळावरून सलग चौथ्या दिवशी शनिवारी (दि. 6) 37 इंडीगोची विमाने रद्द करण्यात आली. यामुळे विमान प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना त्यांचे नियोजित दौरे पुढे ढकलावे लागले. तर अनेकांची कामे यामुळे अडकून पडली.
गेल्या चार दिवसांपासून देशभरात पायलटच्या कमतरतेमुळे इंडीगोची विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम पुणे विमानतळावर देखील झाला असून, गेली चार दिवस पुणे विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक विमाने रद्द झाल्यामुळे बहुतांश प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.
अनेक प्रवाशांनी तर एअरलाईन्स आणि विमानतळ प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांशीच वाद घातले. मात्र, अखेर डीजीसीएने शुक्रवारी पायलट संदर्भातील आदेश मागे घेतल्यामुळे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला सुरूवात झाली. मात्र, ही स्थिती पुर्णपणे पुर्व पदावर येण्यासाठी आणखी 8 ते 10 दिवस लागण्याची शक्यता असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे
- पहिला दिवस:- (दि.3)- 12 विमानांची उड्डाणे रद्द
- दुसरा दिवस:- (दि.4)- 38 विमानांची उड्डाणे रद्द
- तिसरा दिवस :- (दि. 5) - 42 विमानांची उड्डाणे रद्द
- चौथा दिवस :- (दि. 6)- 37 विमानांची उड्डाणे रद्द झाली.
पुणे विमानतळावरून शनिवारी इंडीगोची 37 विमाने रद्द करण्यात आली. असे असले तरी पुणे विमानतळाच्या टर्मिनलमधील प्रवाशांची गर्दी शनिवारी कमी झाल्याचे दिसले. अनेकांनी इंडीगो विमानाच्या गोंधळाच्या बातम्या ऐकताच तिकीटे रद्द करून पर्यायी साधनांचा वापर केला तर काहींनी आपला दौरा काही ठराविक कालावधीसाठी पुढे ढकलला. तसेच, शुक्रवारी सायंकाळी डीजीसीएने आदेश मागे घेतल्यावर आता इंडीगोची विमाने उशिरा का होईना हळूहळू झेपावत आहेत. त्यामुळे शनिवारी पुणे विमानतळाच्या टर्मिनलमधील गर्दी काहीशी कमी झाल्याचे चित्र दिसले.
सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाचे पथक सर्व संबंधित भागधारकांसोबत समन्वय साधत आहे. प्रवाशांना योग्य ती मदत केली जात आहे. कामकाज सुरळीत सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांच्या विमानाची सद्यस्थिती संबंधित एअरलाइनकडून तपासून घ्यावी.
संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ