

मंचर : अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथील कौलीमळा येथील रविंद्र वाळके यांच्या घराच्या जवळ शनिवारी पहाटे चार वाजता पुन्हा एकदा बिबट्या येऊन गेल्याचे सी सी टी व्ही मध्ये कैद झाले आहे. त्या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अठरा दिवसात पुन्हा बिबट्या घरच्या जवळ आल्याने भीतीचे वातावरण आहे.
कौलीमळा येथील रविंद्र वाळके यांच्या घराच्या पोर्च मध्ये अठरा तारखेला पहाटे तीन बिबटे आले होते. तेव्हा पासून घराशेजारी पिंजरा लावला आहे.शनिवार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्या जुन्या घराच्या मागील बाजूने आला .
जुन्या घरासमोरून पुन्हा नवीन बंगल्याच्या समोरील व-र्हांडया मधून घराशेजारील रस्त्याने पूर्वेस निघून गेल्याचे सी सी टी व्ही मध्ये कैद झाले आहे. नवीन घराच्या उत्तरेस वनविभागाने पिंजरा लावून त्यात भक्ष्य म्हणून दोन कोंबड्या ठेवल्या आहेत तरी त्याकडे त्याने ढुंकून ही न पाहता निघून गेला आहे.
शुक्रवारी सायंकाळी भोरवाडी भोरमळा परिसरात बिबट्या शेतात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या अगोदर दोन दिवसापूर्वी अवसरी खुर्दच्या पूर्वेस तीन बिबटे चारचाकी गाडीस आडवे जाताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या मुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा .अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.