

Bank Of India Viral Message Fact Check:
पुणे : तुमचं बँक अकाऊंट सस्पेंड झालं आहे, तातडीने ई-केवायसी करा असा मेसेज पाठवून मोबाईल युजर्सचे WhatsApp आणि मोबाईल हॅक केल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पुण्यातील बऱ्याच मोबाईल युजर्ससोबत असा प्रकार घडला असून, नागरिकांनी अशा कोणत्याही एपीके फाईल डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
प्रिय खातेधारकांनो, तुमचं बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट आजपासून सस्पेंड करण्यात येत आहे. कारण तुम्ही आधार आणि पॅन कार्ड केवायसी केले नव्हते. सोबत पाठवलेली एपीके फाईल तातडीने डाऊनलोड करा आणि ई-केवायसी पूर्ण करा, असे पत्रक व्हायरल झाले आहे. बँक ऑफ इंडियाचे लोगो असल्याने युजर्सना हे पत्रक खरं वाटू शकते.
मोबाईल युजरने फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्या युजरच्या व्हॉट्स App वरून इतरांनाही मेसेज पाठवले जात आहेत. त्यामुळे हा मोबाईल किंवा Whats App हॅकिंगचा हा प्रकार असावा, असा प्राथमिक संशय आहे.
पुढारी डिजिटल टीमने व्हायरल पत्रकाचे फॅक्ट चेक केले असता, पत्रक खोटे असल्याचे स्पष्ट होते. पत्रकाच्या शेवटी दिलेला ईमेल आयडी जीमेलचा आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत लेटरहेडवरील ईमेल आयडी हे जीमेलचे नाहीत, ते बँक ऑफ इंडियाचे असतात. उदा. @bankofindia.bank.in असा ईमेल आयडी असला पाहिजे. याशिवाय पत्रकावर लोगोच्या रंगातही किरकोळ फरक असून पत्रकावर तारीख आणि इतर महत्त्वाचे तपशीलही नाहीत.
गुगल रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केला असता ऑगस्टमध्येही हेच पत्रक व्हायरल झाले होते. X वर सीए ए के मित्तल या युजरने पोस्ट केली होती. बँक ऑफ इंडियाच्या नावाने फेक मेसेज फिरत असून आरबीआयने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
निष्कर्ष : पुढारी डिजिटल टीमच्या फॅक्ट चेकमध्ये पत्रक हे खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाईल युजर्सनी अशा कोणत्याही पत्रकावर विश्वास ठेवू नये. तसेच अधिक माहितीसाठी बँकेच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.