PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: कात्रज–आंबेगाव प्रभागात नियोजन कोलमडले; डीपी रस्ते रखडले, अतिक्रमण–कोंडी कायम

वेगाने वाढलेल्या नागरीकरणाला महापालिकेचे दुर्लक्ष; पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व वाहतूक समस्यांनी नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

रवी कोपनर

पुणे: शहराच्या दक्षिण प्रवेशद्वारावर असलेल्या बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज प्रभागात (क्र.38) नागरीकरण झपाट्याने वाढल आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत मुलभूत सुविधा पुरविण्यात महापालिकेला म्हणावे तेवढे यश आले नाही. तसेच नव्याने समाविष्ठ केलेल्या गावांच्या विकासबाबतही प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे. रखडेलेले डीपी रस्ते, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांच्या विळख्यात हा प्रभाग अडकला असून नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना आजही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पुणे शहरात नियमित पाणीपुरवठा होत असताना या प्रभागात मात्र आठवड्यात एक दिवसाच्या ‌‘क्लोजर‌’चा कलंक प्रशासनाला अद्यापही पुसता आलेला नाही. महापालिकेत नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांच्या विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या अन्यायकारक आरक्षणामुळे मूळ गावकऱ्यांमध्ये तीव नाराजी आहे. तसेच बीडीपी क्षेत्रात तीन पट कर आकारणी केली जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. कात्रज चौकात तीन महामार्ग येवून मिळत असल्याने या ठिकाणी वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी आणि लहान-मोठे अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने कात्रज चौक ते नवले पुलादरम्यानच्या सहा पदरी रस्ता रुंदीकरण आणि कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कामे पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी आणि अपघात काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. मात्र प्रभागातील अनेक डीपी रस्ते विकासापासून वंचित आहेत. या प्रभागात वेळीअवेळी आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक सोसायट्यांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लगत असल्याने रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान, बहुद्देशीय हॉल आणि संतोषनगर येथे महापालिकेचा दवाखाना सुरू केला. उंच भागात सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना केल्या. अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आदींसह सुमारे 62 कोटींची विकासकामे मार्गी लावली.
वसंत मोरे, माजी नगरसेवक

समान पाणीपुरवठा योजनेतून लेक विस्टा आणि वंडरसिटी परिसरात पाण्याच्या दोन टाक्या उभारण्यात आल्या असून, त्या कार्यान्वित होण्याची अद्यापही नागरिकांना प्रतीक्षा आहे. कात्रज नवीन बोगदा झाल्यानंतर कात्रज ते शिंदेवाडी दरम्यानच्या जुन्या घाट रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा काढण्यात आला. मात्र वाहतूक कमी झाली नसल्याने या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच जुन्या कात्रज घाटात बोपदेव घाटासारख्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी देखील होत आहे.

जाधवनगर येथे डायनोस्टिक सेंटर व प्रसूतिगृहाची उपलब्धता केली. लाईट हाऊसची उभारणी केली. सार्वजनिक स्वच्छतागृहांसह विविध मूलभूत सुविधा आणि विकासकामे केली.
राणी भोसले, माजी नगरसेविका

गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी आणि भिलारेवाडी भागातून वाहणाऱ्या ओढ्यातून मैलायुक्त पाणी वाहत नानासाहेब पेशवे तलावात येत आहे. यावर उपाययोजना म्हणून 10 कोटींची ड्रेनेज लाइन टाकली आहे. मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे या गावांतील ड्रेनेज लाइन मुख्य वाहिनीला अद्यापही जोडल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या ओढ्यातून मैलायुक्त पाणी वाहत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ओढ्यावरील अतिक्रमणे आणि सुरक्षा भिंतीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

गुजर-निंबाळकरवाडी येथे मुख्यमंत्री ग््राामसडक योजनेतून मुख्य रस्त्याचे काम केले आहे. समाविष्ठ गावांत 10 कोटींच्या ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी पाठपुरावा केला. 17 कोटी रूपयांची मूलभूत सुविधांची विकासकामे मार्गी लावली आहेत.
व्यंकोजी खोपडे, माजी सरपंच, गुजर-निंबाळकरवाडी
प्रभागातील पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन टाकी उभारली. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी डीपी रस्त्याच्या विकासावर भर दिला. क्रीडांगण, बहुद्देशीय संकुल यासह विविध प्रकल्प आणि मूलभूत सुविधांची सुमारे 48 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली.
युवराज बेलदरे, माजी नगरसेवक

जांभूळवाडी तलावात येणारे मैलायुक्त पाणी, दुर्गंधी आणि सुशोभीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रिंग रोड बाधितांच्या मोबदल्याचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. आंबेगाव परिसरातील कचरा डेपोमुळे रहिवारशांमध्ये नाराजी आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे विभाजन करून आंबेगाव पोलिस ठाण्याची निर्मिती केल्याने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासा मिळाला आहे.

प्रभागात या भागांचा समावेश

बालाजीनगर, कात्रज, संतोषनगर, जाधवनगर, भारतनगर, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी-कोळेवाडी, आंबेगाव खुर्द, शनिनगर, आगममंदिर, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर, आंबेगाव पठार सर्व्हे नंबर 15 व 16, दभाडी परिसर.

भगवान महावीर स्वामी उद्यान, जलतरण तलाव आणि बहुद्देशीय इमारतीची उभारणी केली. जाधवनगर ते निंबाळकरवस्ती दरम्यानचा डीपी रस्त्याचा विकास यासह प्रभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. नागरिकांना विविध मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रकाश कदम, माजी नगरसेवक
बालाजीनगर येथे उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. धनकवडे आणि दुगड मनपा रुग्णालयांची उभारणी करून नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पाणीपुरवठा बूस्टर, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाइन आदींसाठी कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत.
दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक

प्रभागातील प्रमुख समस्या

  • पाणीपुरवठा आठवड्यात एक दिवस क्लोजर

  • कात्रज चौक ते घाट रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रतीक्षा

  • डीपी रस्ते अद्यापही विकासापासून वंचित

  • जांभूळवाडी तलावातील जल प्रदूषण रोखण्यास अपयश

  • बीडीपी क्षेत्रातील नागरिकांकडून तीन पट कर आकारणी

  • अनधिकृत हातगाड्या, पथारी व्यावसायिकांची अतिक्रमणे

  • कात्रज चौक, दत्तनगर चौक आणि त्रिमूर्ती चौकातील वाहतूक कोंडी

  • समाविष्ठ गावांत पाणी, ड्रेनेजसह मुलभूत सुविधांचा अभाव

  • जांभूळवाडी येथे आजही स्मशानभूमीचा अभाव

प्रभागात झालेली विकासकामे

  • वंडरसिटी ते कात्रज डेअरीदरम्यान डीपी रस्ता

  • नवीन आंबेगाव पोलिस ठाण्याची निर्मिती

  • 45 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या

  • आंबेगावात नवीन स्मशानभूमीचे काम

  • सुंदरबाई कोंढरे उद्यानाची उपलब्धता

  • जाधवनगर येथे डायनोस्टिक

  • सेंटर आणि प्रसूतिगृह

  • महापालिकेचा हजरत मौलाना युनूस दवाखाना

  • जाधवनगर चौक ते निंबाळकरवस्ती

  • दरम्यान डीपी रस्ता

  • फालेनगर बहुद्देशीय संकुल

  • छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण

  • आंबेगावातील रस्त्यावरील

  • धोकादायक वळणे काढली

  • आंबेगाव पठार परिसराकडे जाणारा

  • खिंड रस्त्याचे काम

दत्तनगर येथे महापालिकेचा थोरवे दवाखाना सुरू केला. पाण्याची टाकी, आंबेगावात नवीन स्मशानभूमी, उद्यान, विरंगुळा केंद्र आदींसह प्रभागात 65 कोटींची विकासकामे केली आहेत.
स्मिता कोंढरे, माजी नगरसेविका
कात्रज चौकाचे रुंदीकरण आणि कल्व्हर्टचे काम केले आहे. जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन आणि अंतर्गत रस्त्यांचा विकास केला आहे. विद्युत वाहिन्या देखील भूमिगत करण्यात आल्या आहेत. संतोषनगर येथील सुरक्षा भिंतीसह कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत.
अमृता बाबर, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT