PMC Ward 41 Development Pudhari
पुणे

PMC Ward 41 Development: पुण्याच्या प्रभाग ४१ मधील समाविष्ट गावे अजूनही 'पाणी' आणि 'सोई'विना! सर्वांगीण विकासाचे आव्हान कायम

महंमदवाडी-उंड्री परिसरात नागरीकरण वाढले, पण सांडपाणी वाहिन्या तुंबल्या, रस्त्यांवर खड्डे; 'टीपी स्कीम' रखडल्याने नागरिकांचा संताप, वाचा समस्यांचा लेखाजोखा.

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 41 महंमदवाडी-उंड्री

महापालिकेच्या नवीन प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक 41 ची नव्याने पुनर्रचना करण्यात आली आहे. महंमदवाडी परिसर आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मात्र, या भागातील नागरिक अद्यापही मूलभूत सोयी, सुविधांपासून वंचित आहेत. नागरिकांना आजही पुरेशा प्रमाणात पिण्याचे आणि वापरावयाचे पाणी मिळत नाही. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या प्रभागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सुरेश मोरे, विकास भाग्यवंत

पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीने (पीएमआरडीए) होळकरवाडी गावात दोन, औताडे-हांडेवाडीत एक आणि वडाचीवाडी येथे एक, अशा एकूण चार टीपी स्कीम होणार आहेत. मात्र, गेल्या सात वर्षांपासून या योजनेचे काम प्रत्यक्षात सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी अडकून पडल्या आहेत. समाविष्ट गावांमध्ये वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत जुन्या सांडपाणी वाहिन्या आता अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सांडपाणी वाहिन्या वारंवार तुंबत असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी सांडपाणी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सांडपाण्याची समस्या गंभीर झाली आहे. खड्ड्यांमुळे या गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी आणि अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नागरीकरण वाढल्याने प्रभागात वाहनांची संख्याही वाढली आहे. मात्र, अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण न झाल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडत आहे. परिसरात नव्याने झालेल्या सोसायट्या, व्यवसाय आणि उद्योगांमुळे कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. घंटागाड्या दररोज येत नसल्याने अनेक ठिकाणी उघड्यावर कचऱ्याचे ढीग साचत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याने नागरी सुविधांवर मोठा ताण येत आहे.

रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत आहे. या गावांचा महापालिकेत समावेश होऊन सहा वर्षे झाली आहेत. मात्र, अद्यापही या भागात उद्यान, क्रीडांगण, भाजीमंडई, वाहनतळ, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि जलतरण तलाव उभारण्यात आला नाही.

प्रभागातील प्रमुख समस्या

महंमदवाडीत डीपी रस्त्यांचा अभाव

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

चोवीस तास पाणीपुरवठा योजनांतर्गत उभारलेल्या पाण्याच्या

टाक्या वापराविना पडून

पिण्याचा आणि वापराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जुन्या सांडपाणी वाहिन्या अपुऱ्या

टीपी स्कीम मंजूर होऊन काम मात्र रखडले

मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था

रस्त्यांच्या रुंदीकरण आणि अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

प्रभागात झालेली विकासकामे

महापालिकेचे बळीबा दशरथ भानगिरे रुग्णालय

उद्याने, महात्मा फुले जलतरण तलाव

कडनगर ते रहेजा चौकामधील ओढ्यावरचा पूल

महत्त्वाचे दोन डीपी रस्ते विकसित

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंंतर्गत पाण्याच्या टाक्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन

महंमदवाडी येथे बॅडमिंटन हॉल

संतसृष्टी आणि पालखी मार्गातील पूल

प्रभागात या भागांचा समावेश

सय्यदनगर, चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, काळेपडळचा काही भाग, वाडकरमळा, हेवन पार्क, कृष्णानगर, दोहराबजी परिसर, ससाणेवस्ती, राजीव गांधी वसाहत, महंमदवाडी, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी आणि येवलेवाडीच्या काही भागाचा या प्रभागात समावेश आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासह महात्मा फुले जलतरण तलाव, छत्रपती संभाजी बालउद्यान, प्रभू रामांचा पुतळा, अहिल्यादेवी होळकर पाण्याची टाकी, फराटे चौक सुशोभीकरण, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान, पालखी रस्ता आणि संतसृष्टीचे काम केले आहे. साठेनगर मुख्य रस्त्यावर जलवाहिनी व ड्रेनेज लाइन, पोलिस ठाणे रस्ता, आंबेकरमळा, कृष्णानगर रस्त्याचे रुंदीकरण, भानगिरेनगर मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज लाइन, डीपी रस्ता, कडनगर ते रहेजा चौकामधील ओढ्यावरचा पूल, वसंत पार्क मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचा विकास केला आहे.
प्रमोद भानगिरे, माजी नगरसेवक
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, वाघजाईमाता भाजीमंडई परिसरात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी, हडपसर डीपी रस्ता आणि महंमदवाडीत क्रीडांगणाचे काम केले आहे. तसेच काळेपडळ, इशरत बाग, हांडेवाडी रोड, सातवनगर, कृष्णानगर येथे विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत. तसेच रस्त्यांचे डांबरीकरण आणि ड्रेनेज लाइनची कामेही केली आहेत.
प्राची आल्हाट, माजी नगरसेविका
वन विभागाची परवानगी घेऊन साडेचार किलोमीटरची जलवाहिनी टाकली आहे. अडीच एकर जागा दफनभूमीसाठी उपलब्ध केली. लोणकर उद्यान, गुरुनानक उद्यान, क्लाऊड नाईन येथील चढ कमी करून 24 फूट रुंदीचा रस्ता, एनआयबीएम रस्ता आणि साळुंखे विहार रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि सर्व्हे नंबर 37 व 38 मध्ये डीपी रस्ता विकसित केला. कोनार्कपूरम येथील सीमाभिंत, दशक्रियाघाट आणि स्मशानभूमीचे नूतनीकरण केले आहे.
नंदा लोणकर, माजी नगरसेविका
समाविष्ट गावांत पिण्याचे पाणी, कचरा, वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्या आहेत. त्यामुळे महापालिकेने प्राधान्याने या गावांतील विकासकामे हाती घ्यावीत.
संजय जाधव, माजी सरपंच, औताडे-हांडेवाडी
महापालिकेत नव्याने समावेश केलेल्या गावांमधील नागरिकांनाही प्रशासनाने मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच मूलभूत सोयी, सुविधा उपलब्ध करून या गावांचा सर्वसमावेशक विकास करणे गरजेचे आहे.
सचिन घुले, माजी उपसभापती
नव्या समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकही महापालिकेला कर देत आहेत. मात्र, शहरी भागाच्या तुलनेत ग््राामीणच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने ग््राामीण भागाचाही सर्वांगीण विकास करावा.
निवृत्ती बांदल, माजी सरपंच, उंड्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT