

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्धी प्रमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अशी मोहन जोशी यांची ओळख. 1999 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही नेतृत्त्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर 2002 च्या निवडणुकीत महापालिकेवरील सत्ता त्यांनी अबाधित राखली. या निवडणुकीविषयी त्यांच्याच शब्दात...
मोहन जोशी
सन 1971 मध्ये (सुमारे 55 वर्षांपूर्वी) काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास मी सुरुवात केली. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाकडे देशातील लाखो तरुण आकर्षित होत होते. युवक काँग्रेस देशात, राज्यात आणि प्रत्येक शहर व गावागावात जोमाने काम करीत होती. मी देखील युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पुणे शहरात काम करीत 1978 मध्ये पुणे शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि त्यानंतर माझ्या राजकीय कामाला वेग आला. पक्षाने नंतर प्रदेश पातळीवर काम करण्याचीही संधी मला दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा पदाधिकारी, प्रसिद्धीप्रमुख व पुढे दोन वर्षे अध्यक्ष अशी जबाबदारी पार पाडत असतानाच युवकांचे संघटन करण्यावर माझा सतत भर राहिला.
पुण्यातील लोकसभा व विधानसभेच्या मतदारसंघांवर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे पुणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्याची जबाबदारी आम्हा तरुणांवर सोपविण्यात आली होती. तत्कालीन राज्यसभा खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पक्षाची वाटचाल सुरू होती. त्यांनी शहराच्या विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे कामेही वेगाने मार्गी लागत होती. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते त्यावेळी घराघरात आणि मनामनात काँग्रेसला रुजवण्यासाठी झटत होते.
राजीव गांधींच्या हत्येनंतर पी. व्ही. नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांच्यापाठोपाठ 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेतली. तरुणांना संधी देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यास अधिक प्रेरणा मिळाली. महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्षाने जिंकून सत्तेवर येणे आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला वेग देणे हेच आमचे प्रमुख ध्येय बनले. 1992 आणि 1997 च्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवून सत्ता मिळविली होती. मात्र 1999 मध्ये काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाली. त्यामुळे 2002 च्या निवडणुकीच्या वेळी महापालिकेवर सत्ता कशी कायम राखायची हे मोठेच आव्हान होते, पण तेही आम्ही पेलले.
काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते गुरुदास कामत हे अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुण कार्यकर्त्ये घडविले, आमदार होण्याची संधीही दिली. त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माझे काम सुरू होते. पुण्यातही अनेक तरुण व होतकरू कार्यकर्त्यांना मी काँग्रेस पक्षात नुसती संधी दिली असे नव्हे तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुणे महापालिकेत त्यांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळावी यासाठी पुणे मनपा निवडणुकीत उमेदवारीही मिळवून दिली. त्यातील अनेक जण आजही पुण्याच्या राजकारणात सक्रिय असून उत्तम काम करीत आहेत. असे नेते घडविण्यात आपला हातभार लागला याचे समाधान वाटते.
2002 मधील महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षांप्रमाणेच नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरुद्धही लढावे लागणार होते. त्यासाठी काँग्रेस पक्षात आम्ही धोरणात्मक व्यूहरचना केली. पुण्याच्या विकासात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा होता. काँग्रेसचे हे योगदान घरोघर पोहोचवणे याबरोबरच तिकीट वाटपात युवक तसेच महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्यावर विशेष भर देण्याचे धोरण आम्ही स्वीकारले. त्यासाठीच ‘काँग्रेस आपल्या दारी’ ही अभिनव कल्पना मी मांडली आणि पक्षानेही ती उचलून धरली. त्यासाठी शहरातील प्रत्येक वॉर्डातील इच्छुक उमेदवाराशी व कार्यकर्त्यांशी बोलून प्रत्येक वॉर्डातून मी पदयात्रा काढल्या. सुमारे महिनाभर पायाला भिंगरी लावल्यासारखा घराघरांत प्रचार करीत आम्ही फिरलो. त्यामुळे काँग्रेस आपल्या दारी घराघरांत पोहोचली. सकाळी न्याहरी करून बाहेर पडल्यावर दुपारी कार्यकर्त्यांसमवेत एखाद्या झाडाखाली किंवा टपरीपाशी झुणका-भाकरी खात आमचे प्रचारदौरे सुरू असायचे.
‘काँग्रेस आपल्या दारी’ हे अभियान राबवताना समाजातील विविध नागरी प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा याची काटेकोर माहिती हाती आली आणि त्याचे प्रतिबिंब काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातही उमटले. उमेदवारी वाटपातही युवक, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिला यांच्यासाठी मी खूप आग्रही राहिलो होतो, त्यामुळे खूप नवे चेहरे काँग्रेस पक्षाला मिळाले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे मतदान विभागले जाऊ नये याची खबरदारी घेताना इतर नेत्यांसमवेत रणनीती आखण्यात मी पुढाकार घेतला. अधिकाधिक मतदार बाहेर काढण्यासाठी आम्ही सारे झटत राहिलो आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला. या निवडणुकीत बहुमतासाठी चार ते पाच जागा आम्हाला कमी पडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून काँग्रेसने महापालिकेवर पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला. पूर्ण बहुमत मिळविता आले नाही, याची खंत होतीच पण पक्षाने केलेली कामगिरीही समाधान देणारी होती. ‘काँग्रेस आपल्या दारी’ या माझ्या कल्पनेचे राज्यभर कौतुक झाले होते.
मनातील मरगळ झटकून अधिक जोमाने काम करण्यासाठी 2002 ची महापालिकेची निवडणूक खूप महत्त्वाची ठरली. त्यानंतर पुढील काळातही या विजयाच्या जोरावर आम्ही काम करत राहिलो. निवडणुकीत जय - पराजय होत असतात मात्र पक्ष संघटना मजबूत ठेवणे आणि समाजातील उपेक्षित, मागास, वंचित, अल्पसंख्याक, महिला आणि युवा वर्गाला प्रेरणा देत काँग्रेस पक्षवाढीवर माझा सदैव प्रयत्न राहिला, तो आजही चालू आहे.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)