

प्रभाग क्रमांक : 21 मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क
मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क या प्रभागातून (क्र. 21) गत निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार निवडून आले होते. मात्र आगामी निवडणुकीत पक्षातील इच्छुकांची वाढलेली संख्या, माजी लोकप्रतिनिधींच्या गेल्या कार्यकाळातील विकासकामांचा हिशेब आणि महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्यास भाजपसाठी हा प्रभाग पूर्वीसारखा सोपा राहिलेला नाही. यामुळे भाजप या प्रभागात वर्चस्व राखणार की गमाविणार? याबाबत नागरिकांत सध्या चर्चा सुरू आहे.
याप्रभागाची लोकसंख्या 80 हजारांपेक्षा जास्त असून, विस्तारही मोठा असल्याने उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दमछाक होणार आहे. या प्रभागात ‘अ’ गट अनुसूचित जाती प्रवर्ग, ‘ब’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ‘क’ गट सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आणि ‘ड’ गट सर्वसाधारण प्रवर्ग, असे आरक्षण पडले आहे. वस्ती भागातील नागरिकांनी बैठक घेऊन स्थानिक उमेदवार देण्याची मागणी केली आहे.
महर्षीनगर, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क परिसरासह इतरही भागात दाट लोकवस्ती आहे. सध्या तरी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांत लढत होणार असल्याचे चित्र आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे उमेदवार निवडून आले होते. मात्र आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार गट) कंबर कसली आहे. परंतु महायुती एकत्रित लढल्यास गेल्या चार टर्मपासून लोकप्रतिनिधी असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची अडचण होणार आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले, तर भाजपला हा प्रभाग पूर्वीसारखा सोपा राहिलेला नाही. या प्रभागातून आनंद, मीरा सोसायटी, डायस प्लॉट, महावीर स्कूलची डावी बाजू लेन, प्रेमनगर, ऋ तुराज सोसायटी हा भाग वगळण्यात आला आहे. या भागात उच्चभ्रू सोसायट्या, पूरग्रस्त पुनर्वसन चाळीसोबत आंबेडकरनगर आणि औद्योगिक वसाहती या भागाचाही समावेश आहे.
या प्रभागातून भाजपच्या इच्छुकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस, मनसेसह इतर पक्षांच्या इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदारांशी संपर्क वाढविला आहे. स्पर्धा वाढल्याने भाजपला ताकद लावावी लागणार आहे. तसेच भाजपच्या माजी नगरसेवकांनी प्रभागाचा काय विकास केला? याचाही विचार मतदार करणार आहेत. या प्रभागात मराठा, जैन समाज मोठा असून, उमेदवार देताना राजकीय पक्षांना हे विचारात घ्यावे लागणार आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपच्या कविता वैरागे निवडून आल्या होत्या. परंतु या वेळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (महिला) आरक्षण नसल्याने त्या अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. माजी नगरसेविका अनुसया चव्हाण यांचे वैरागे यांच्यासमोर आव्हान असणार आहे. तसेच या प्रवर्गातून काँग्रेसकडून अनुसया गायकवाड, पुष्कर अबनावे, रावसाहेब खवळे, रुक्मिणी धेडे, भाजपकडून उषा साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) लखन वाघमारे, दीपक डोंगरे, रेणुका गायकवाड, मनसेकडून सनी खरात, ललित तिंडे हे इच्छुक आहेत. तसेच किरण गायकवाड हे देखील इच्छुका आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाल्याने माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांना आता सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय उरला नाही. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून (महिला) समृद्धी अरकल-शेरला यांचे नाव भाजपकडून चर्चेत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) शोभा नांगरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) मृणालिनी वाणी, आश्विनी राऊत या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपच्या राजश्री शिळीमकर, मनीषा चोरबेले काँग्रेसकडून योगिता सुराणा, सीमा महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) श्वेता होनराव निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून भाजपचे प्रवीण चोरबेले हे निवडून आले होते. या वेळी श्रीनाथ भिमाले यांनी सर्वसाधारण गटातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच भाजपकडून आशिष गोयल, निखिल शिळीमकर, संजय गावडे, प्रसन्न वैरागे हे देखील इच्छुक आहेत. काँग्रेसकडून भरत सुराणा, सुरेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) संतोष नांगरे, दिनेश खराडे, राहुल गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) बाळासाहेब अटल, मोहसीन काझी, सागर कामठे, सचिन निगडे मनसेकडून मंगेश जाधव, सलीम सय्यद शिवसेनेकडून (ठाकरे गट) राजेंद्र शशिकांत शिळीमकर, ऋषभ नानावटी इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) सुधीर नरवडे यांच्या नावांची चर्चा आहे.
मराठा समाजातील मतदारांबरोबर जैन समाजातील मतदारांची संख्याही या प्रभागात अधिक आहे. तसेच मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदारही आहेत. या प्रभागात 2017 मधील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी एकहाती कमळ फुलवण्याची किमया केली होती. मात्र, या वेळी निवडणुकीत बदल होणार का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.