

पुणे: प्रसार माध्यमांमुळे आमच्याकडे येणाऱ्या व्हीव्हीआयपींना त्रास होतो. मागच्या वर्षी तुमच्यामुळे एनडीएच्या पीओपीचा फ्लॅाप शो झाला...हे बोल रविवारी भल्या पहाटे ५.३० वाजता पुण्यातील पत्रकारांना एनडीएच्या अधिकाऱ्यांनी सुनावले. या शब्दांनी व्यथीत झालेल्या सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत परेड सोडले. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकारांना पहाटे ५.३० ते दुपारी १२ पर्यंत तेथेच अडकून पडावे लागले.
खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची ( एनडीए ) स्थापना झाली तेव्हापासून पुण्यातील प्रसारमाध्यमे नोव्हेंबर आणि मे महिन्यातील पासिंग आऊट परेडचे लाईव्ह वार्तांकन करतात. यात देशसेवेत जाणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कॅडेटसह आई-वडीलांचा नातेवाइकांचा सन्मान होतो. एनडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरवगाथांवर बातम्या, लेख प्रसिध्द होतात. मात्र याची कोणतीही जाणीव एनडीए प्रशासनातील अधिकाऱ्यांना नसल्याचा प्रत्यय रविवारी अनुभवास आला. रविवारी (३० नोव्हेंबर) झालेल्या १४९ व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार आणि फोटोग्राफर यांना एनडीए प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे.
पूर्व नोंदणी करुनच पत्रकारांना निमंत्रण
कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पत्रकारांची पूर्वनोंदणी दहा दिवस आधीच करून घेतली होती. कार्यक्रमास्थळी पत्रकारांसाठी असलेली बैठक व्यवस्था या वेळी अचानक बदलण्यात आली. कारण तेथे आलेल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना पत्रकारांमुळे हा कार्यक्रम पाहता येत नाही, असे अजब कारण काही अधिकाऱ्यांनी दिले.
पत्रकारांना दिली मागे जागा
पत्रकारांना बसण्यासाठी दिलेल्या जागेवरून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांचे भाषण ऐकने तसेच परेडचे छायाचित्रण व व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे शक्यच नव्हते. पासिंग आऊट परेड हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा असल्याने कार्यक्रमाच्या अचूक वार्तांकनासाठी हा अचानक केलेला जागा बदल अडचणीचा होता.
असभ्य भाषेत केला सर्वांचा अपमान
''तुम्हाला आम्ही दिलेल्या ठिकाणीच बसावे लागेल. मान्य असल्यास बसा, अन्यथा तुम्ही निघून जा, मी कोणाला घाबरत नाही. मागच्या वेळेस तुमच्यामुळेच कार्यक्रमाचा फ्लॉप झाला होता.'' या भाषेत कार्यक्रमस्थळी असलेल्या अधिकाऱ्यांपैकी मेजर प्रतापसिंह चौधरी यांनी पत्रकारांशी उद्धट वर्तन करत अपमानास्पद टिप्पणी केली. अशी टिप्पणी आणखी एका अधिकाऱ्याने केली. सैन्य दलातील अत्यंत जबाबदार पदावरील अधिकाऱ्यांची ही विधाने चुकीची, अपमानास्पद होती. त्यामुळे पत्रकारांनी याबाबत नाराजी व्यक्त करत आत्मसन्मान जपण्यासाठी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
पत्रकार संघाने पाठवले निषेधाचे पत्र
पुणे श्रमिक पत्रकार संघाने या प्रकाराची तत्काळ दखल घेत अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील आणि सचिव मंगेश फल्ले यांनी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथससिंह, तिन्ही दलाचे प्रमुख सीडीएस जन. अनिल चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लष्कर प्रमुख, हवाईदल प्रमुख, नौदल प्रमुखांसह पीआयबी, जिल्हा माहिती अधिकारी यांना झाल्या प्रकाराचा कडक निषेध नोंदवत अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारे सविस्तर पत्र पाठवले आहे.