

किशोर बरकाले
पुणे : राज्यात ऊस पिकाखालील सरासरी क्षेत्र सद्यःस्थितीत 13 लाख 11 हजार 808 हेक्टरइतके आहे. चालू वर्षी नव्याने आडसाली, पूर्वहंगामी ऊस लागवडीमध्ये गतवर्षापेक्षा सुमारे 66 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड वाढली आहे.
तसेच यंदाच्या सर्व हंगामात मिळून ऊस लागवडीखालील एकूण क्षेत्र 15 लाख हेक्टरवर पोहचण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या गाळपासाठी राज्यात उसाचे उंदड पीक येण्याची आशा निर्माण झाली आहे.
सर्वसाधारणपणे तीन हंगामात उसाची लागवड केली जाते. त्यामध्ये आडसाली उसाची दिनांक 1 जुलै ते 15 ऑगस्ट, पूर्वहंगामी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर, सुरू हंगामात 15 डिसेंबर ते 15 फेबुवारी या कालावधीत लागवड केली जाते. 15 फेबुवारीपूर्वी तुटलेल्या उसाचा खोडवा पीक घेण्यावर शेतकरी भर देतात. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार 66 हजार हेक्टरवर ऊस लागवड गतवर्षापेक्षा यंदा वाढली आहे. राज्याची सरासरी ऊस उत्पादकता 98 मे.टन असून त्यातून सुमारे 65 लाख मेट्रिक टनाइतके उसाची जादा उपलब्धता गाळपासाठी होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात कृषी विभागाच्या अंदाजानुसार चालूवर्ष 2025-26 मध्ये 13 लाख 71 हजार हेक्टरवर ऊस पीक उभे आहे. तर प्रति हेक्टरी उसाची सरासरी उत्पादकता 98 मेट्रिक टनाइतकी आहे. यामुळे यंदा लागवड होणारा ऊस हा पुढील वर्षीच्या म्हणजे 2026-27 च्या हंगामातील गाळपासाठी उपयोगात येतो. राज्यात चालूवर्षी अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे जरी नुकसान झाले असले तरी ऊस पिकासाठी हा पाऊस अन्य पिकांच्यातुलनेत लाभदायी ठरला आहे.
केंद्र सरकारकडून उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीत (एफआरपी) वाढ करण्यात आली आहे. एफआरपीच्या रक्कमेत दरवर्षी होणारी वाढ आणि कायद्यान्वये घोषीत केलेला दर मिळण्याची खात्री यामुळे शाश्वतता असल्याने ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा पाऊस मुबलक झाल्याने शिवारात पाणी उपलब्धता अधिक आहे. त्यामुळे आडसाली व पूर्वहंगामात ऊस लागवड वाढली असून सुरू हंगामातही लागवड वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी म्हणजे 2026-27 मध्ये राज्यात ऊस पिकाखालील क्षेत्र वाढून सुमारे 15 लाख हेक्टर होईल तसेच गाळपासाठी उसाची उपलब्धता सुमारे 1400 लाख मे.टनाइतकी होऊ शकते.
वैभव तांबे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.