शिवनगर, सांगवी : पुढारी वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील निरावागज बंधाऱ्यातील साठवलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले आहे, हे प्रदूषण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सांडपाण्यामुळेच झाल्याने प्रदूषणाबाबत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा २२ मार्चपासून कारखान्याच्या कार्यालयासमोर चक्री उपोषण करणार असल्याचे निवेदन खांडज येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.१४) कारखान्याला दिले आहे.
माळेगाव कारखान्यातील अतिविषारी रसायनमिश्रित पाणी निरावागज बंधाऱ्याच्या पाण्यात मिसळून ते दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे मानवासह जनावरे, पशू-पक्षी, जलचर प्राणी व शेती धोक्यात आली आहे. शेतीसह इतर घटकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकाराला कारखाना प्रशासन जबाबदार असून १० वर्षे झाली, वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसून जबाबदारी टाळली जात आहे. माळेगाव कारखान्याने ई. टी. पी. प्लॅन्ट बसवला आहे. आमचे पाणी नदीपात्रात जात नसल्याचे सांगून नदीकाठच्या ग्रामस्थांची, शासनाची माळेगाव कारखाना प्रशासन फसवणूक करीत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलिस अधिकारी आदींना देण्यात आले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी निरा नदीकाठचे शेतकरी व महिला या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हे निवेदन कार्यालयप्रमुख जवाहर सस्ते यांनी स्वीकारली.