कोल्हापूर : ‘महावितरण’च्या कार्यालयातच शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : ‘महावितरण’च्या कार्यालयातच शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पाणीपुरवठा संस्थेची वीज जोडणी तोडल्याच्या कारणावरून महे येथील शेतकर्‍याने महावितरणच्या ताराबाई पार्क येथील ग्रामीण विभाग एकच्या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने महावितरण कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला. एक महिला कर्मचारी बेशुद्ध झाली. कर्मचारी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सोमवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

महावितरणतर्फे वीज बिल वसुली मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. घरगुती जोडणीपासून कृषिपंप जोडणीपर्यंत सर्वच ग्राहकांकडे महावितरण पाठपुरावा करीत आहे. प्रसंगी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. महे (ता. करवीर) येथील पाणीपुरवठा संस्थेचेही वीज कनेक्शन तोडले आहे.

या संस्थेचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने वीज बील भरा; अन्यथा वीज तोडण्याची नोटीस दिली होती. मुदतीत पैसे न भरल्याने महावितरणने वीज तोडण्याची कारवाई केली.

याचा जाब विचारण्यासाठी गावातील काही कार्यकर्ते महावितरण कार्यालयात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आले होते. कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांच्या दालनासमोर संबंधित कार्यकर्ते आले आणि थेट पाटील यांच्या दालनात घुसले. यावेळी अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात चर्चा सुरू असतानाच निवास पाटील याने हातातील डिझेलचा कॅन अंगावर ओतून रिकामा केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने कार्यालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला. अधिकारी, कर्मचार्‍यांनी पाटील याची समजूत काढून आत्मदहनापासून प्रवृत्त केले. या गोंधळात महिला कर्मचार्‍यास चक्‍कर आल्याने कर्मचार्‍यांची धांदल उडाली.

अधिकार्‍यांनी पोलिसांना कल्पना दिल्याने पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाटील यास ताब्यात घेतले आहे. कार्यकारी अभियंतांच्या दालनासह व्हरांड्यात डिझेल पडल्याने सर्वत्र डिझेलचा दर्प पसरला होता. दरम्यान, संबंधित संस्थेची 2014 पासून थकबाकी असून, एकूण वीज बिल 33 लाख रुपये असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

Back to top button