रशिया-युक्रेन युद्ध : मारियुपोलमध्ये आतापर्यंत 2500 मृत्यू | पुढारी

रशिया-युक्रेन युद्ध : मारियुपोलमध्ये आतापर्यंत 2500 मृत्यू

मॉस्को/कीव्ह : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्धाला 19 दिवस झाले असून युक्रेनच्या दक्षिणेकडील मारियुपोल या शहरात रशियन बॉम्बफेकीत आतापर्यंत 2500 हून अधिक मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच यांनी सांगितले की, मारियुपोल येथे आमच्या सैन्याला यश मिळाले आहे. आम्ही रशियन सैन्याला पराभूत करून युद्धबंदी असलेल्यांना स्वतंत्र केले. त्यामुळे खवळलेल्या रशियन फौजांनी शहर उद्ध्वस्त केले.

दरम्यान, युद्धामुळे युक्रेनमधील लाखो स्थलांतरितांनी युरोपातील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. यातील बहुतेक स्थलांतरितांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे युरोपात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. 3 ते 9 मार्च या कालावधीत युक्रेन आणि आसपासच्या देशांमध्ये कोरोनाचे एकूण 7 लाख 91 हजार 021 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 8012 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत 20 लाखांवर युक्रेनियन नागरिकांना स्थलांतर केल्याचे सांगितले जात आहे.

रशियाने चीनकडे मागितली मदत

अमेरिकेतील वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार रशियाने चीनकडे लष्करी उपकरणांची मागणी केली आहे. तसेच अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांनी लावलेल्या निर्बंधातून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी पुतीन यांनी जिनपिंग यांच्याकडे आर्थिक मदतही मागितल्याचे म्हटले आहे.

युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 20 ठार

युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 20 नागरिक ठार झाल्याचे रशियाच्या सैन्याने म्हटले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्‍ता मेजर जनरल इगॉर कोनाशेन्कोव्ह म्हणाले की, रशियन बनावटीच्याच तोचका-यु या क्षेपणास्त्राद्वारे युक्रेनने सोमवारी डोनेटस्क येथे हल्ला केला. यात 20 नागरिक ठार झाले असून 28 जखमी झाले आहेत.

युक्रेनमध्ये प्रसूती वॉर्डवर बॉम्बहल्ला

रशियाने प्रसूती वॉर्डवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात गर्भवती महिलेसह तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बॉम्बहल्ल्यात ही महिला जखमी झाली. रक्‍तबंबाळ अवस्थेत तिला दुसर्‍या दवाखान्यात दाखल केले गेले, पण उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. रशियन अधिकार्‍यांनी मात्र ही फेकन्यूज असल्याचे म्हटले आहे. प्रसूती रुग्णालयांचा वापर युक्रेनचे कट्टरवादी स्वतःच्या संरक्षणासाठी करत असून अशा ठिकाणी कुणीही महिला नव्हती, असे रशियाने म्हटले आहे.

पोप यांचे आवाहन

ख्रिश्‍चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी ‘युक्रेनमधील शहरांचे स्मशानात रूपांतर होत आहे, कुठलेही सबळ कारण नसताना केलेले हे सैन्य आक्रमण आहे. हे अजिबात स्वीकारार्ह नाही. हे रानटी कृत्य आहे. देवासाठी तरी हे हत्याकांडा थांबवा,’ असे आवाहन केले.

 

Back to top button