पुणे

पिंपरी : आयुक्तांचा 14 कलमी करेक्ट कार्यक्रम : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेनऊशे गुन्हेगारांची कोंडी

अमृता चौगुले

संतोष शिंदे

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील साडेनऊशे गुन्हेगारांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी या गुन्हेगारांची चौदा प्रकारची अद्यावत माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि त्यांच्या संपर्कात असलेल्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी नुकतेच प्रभाग रचना जाहीर झाली. त्यामुळे शहरातील इच्छुक कामाला लागले आहेत.

प्रभागावर आपलेच वर्चस्व असल्याचे दाखविण्यासाठी गुंडही सरसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या गुंडांची आधीच कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील टोळ्यांच्या हालचालीवर 'वॉच' ठेवण्यासाठी सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेची पाच युनिट यासह अन्य पथकांना यासाठी कामाला लावले आहे. गुन्हेगारांची कोंडी करण्यासाठी त्यांची इत्यंभूत माहिती पोलिसांकडे हवी, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांनी साडेनऊशे गुन्हेगारांची 14 प्रकारची माहिती संकलित केली. यामध्ये गुन्हेगाराचे पूर्ण व टोपण नाव, वय, शिक्षण, कामाच्या ठिकाणचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक, सध्याचा व मूळ गावचा पत्ता, एकूण दाखल गुन्हे, गुन्हेगाराची सवय, नातेवाईकाचे नाव, पत्ता, व्यवसाय आणि मोबाईल क्रमांक, गुन्हेगाराच्या साथीदाराचे नाव, वय, शिक्षण पत्ता आणि मोबाईल क्रमांक, साथीदारावर दाखल असलेले गुन्हे, गुन्हेगारांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन आणि त्याचा स्रोत यासह काही गोपनीय माहिती एका चार्टमध्ये भरून घेण्यात आली आहे.

त्यामुळे निवडणूक काळात वळवळ करण्याची शक्यता असलेल्या गुन्हेगारांचा 'कॅरेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटांसाठी दादागिरी नको पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी, चाकण, तळवडे परिसरात औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यातील कंत्राट मिळवण्यासाठी काही स्थानिक गुंड दादागिरी करतात. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अशा औद्योगिक गुंडांची देखील कुंडली काढली आहे. आतापर्यंत यांच्याकडे एकूण 48 जणांची माहिती गोपनीयरित्या प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता इथून पुढे कंत्राटासाठी दादागिरी करणार्‍यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा मागू शकतो.

या टोळ्यांच्या हालचालींवर करडी नजर

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अभिलेखावर एकूण 60 गुन्हेगारी टोळ्या आहेत. यातील 16 महत्वाच्या टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. यामध्ये बाळू वाघेरे, राकेश भरणे, वाघ्या मारणे, रावण, विकी घोलप, सचिन सौदाई, संतोष खलसे, शाहरुख खान, साहिल जगताप, महेमूद कोरबू , महेश डोंगरे, पिंटू जाधव, अवधूत गाढवे, स्वप्नील शिंदे, मयूर उर्फ बंटी टकले, करण रोकडे या टोळ्यांची नावे आहेत.

शहरातील गुन्हेगारी टोळ्यांची ठाणेनिहाय माहिती

पिंपरी 8
चिंचवड 2
भोसरी 3
एमआयडीसी भोसरी 3
निगडी 8
दिघी 2
चाकण 3
वाकड 12
हिंजवडी 1
देहूरोड 5
तळेगाव दाभाडे 4
तळेगाव एमआयडीसी 00
चिखली 6
रावेत 1
सांगवी 1
म्हाळुंगे 1
आळंदी 00
शिरगाव 00

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौदा प्रकराची अद्यावत माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात सराईत गुन्हेगाराचा शोध घेणे सोपे होणार आहे.

                                             -अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT