संगमनेर विशेष : चंदनापुरी घाटात टेम्पोचा थरार; शिर्डीहून भीमाशंकरला निघालेले 11 भाविक बचावले | पुढारी

संगमनेर विशेष : चंदनापुरी घाटात टेम्पोचा थरार; शिर्डीहून भीमाशंकरला निघालेले 11 भाविक बचावले

संगमनेर विशेष : पुढारी वृत्तसेवा

शिर्डीहून श्रीसाईबांबाचे दर्शन घेऊन पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात अचानक आग लागली. या बर्निंग टेम्पोत सुदैवाने या कोपरगावच्या चालकासह तेलंगणा राज्यातील भाविक बचावले. तेलंगणा राज्यातील दहा भाविक शिर्डीत श्रीसाईबाबांच्या दर्शनाला आले होते.

दर्शनानंतर ते शिर्डीहून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे महादेवाच्या दर्शनाला जाण्यास त्यांनी शिर्डी येथून टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एम एच 12 के.आर. 0434) भाडोत्री घेतला. टेम्पो ट्रॅव्हलर काल (शनिवारी) सकाळी 7:30 वा. चंदनापुरी घाटातील पहिल्या वळणावर आला असता, बोनेटमधून धूर आल्याचे चालक विजय धोंडिबा काकडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून, प्रवाशांना उतरविल्याने पुढील अनर्थ टळला.

Wedding : विधवा वहिनी सोबत दिराने केला विवाह ; दोन लहान मुलांचा देखील करणार सांभाळ !

चालक काकडे यांनी डोळासणे महामार्ग पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. महामार्गाचे पो. उ.नि. सचिन सूर्यवंशी यांनी पो. काँ. एच. सी. ढोकरे, पी. एन. पुजारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामन बंबाला पाचारण करुन आग शमविण्यात आली. या आगीत टेम्पो ट्रॅव्हलर वाहन खाक झाले आहे.

अपघातांची मालिका सुरू..!

नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांना आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. चंदनापुरी घाटातच बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणार्‍या टेम्पोला भीषण आग लागून टेम्पो खाक झाला होता. या दुर्घटनेमुळेच 12 वी मराठीचा पेपर पुढे ढकलावा लागला होता. गेल्या दोन महिन्यांत अपघातांच्या तब्बल डझनभर दुर्घटना घडल्या आहेत.

 

Back to top button