कर्जबाजारीपणामुळे सोलापुरातील पोलीस हवालदाराची मुंबईत आत्महत्या | पुढारी

कर्जबाजारीपणामुळे सोलापुरातील पोलीस हवालदाराची मुंबईत आत्महत्या

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा कर्जबाजारीपणामुळे कांजूरमार्ग परिसरात एका पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौतम साबळे, असे या पोलीस हवलदाराचे नाव आहे. गौतम साबळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

गौतम साबळे हे कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगर येथील इमारत क्र. पी 1 येथे वास्तव्याला होते. साबळे यांनी एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे बँकांच्या कर्जाचे हफ्ते फेडू शकत नसल्याने ते नैराश्येत होते. याच विवंचनेतून शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येची माहिती मिळताच कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. साबळे यांच्या कुटुंबीयांना सोलापूरमध्ये घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, साबळेंनी इतके कर्ज का घेतले होते?, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Back to top button