Corona : पुण्यात दोन नव्या व्हेरियंटचे 7 रुग्ण | पुढारी

Corona : पुण्यात दोन नव्या व्हेरियंटचे 7 रुग्ण

मुंबई/पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची संख्या 500 च्या पुढे सरकत असतानाच पुण्यात ओमायक्रॉनच्या बी.ए. 4 व्हेरियंंटचे चार तर बी.ए. 5 व्हेरियंंटचे तीन असे सात रुग्ण दोन नव्या व्हेरियंटचे आढळून आल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

या रुग्णांमध्ये 4 पुरुष, तर 3 महिलांचा समावेश असून, यातील चौघे पन्नाशीपुढील तर दोघे 20 ते 40 वयोगटातील आहेत. एकजण 10 वर्षांखालील आहे. यातील दोघांनी दक्षिण आफ्रिका, बेल्जियमचा प्रवास केला आहे तर 3 जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटकात प्रवास केला आहे. या सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि एकाने तर बूस्टर डोसदेखील घेतलेला आहे. यापैकी कुणालाही रुग्णालयात दाखल करावे लागलेले नाही. हे सर्व जण घरीच विलगीकरणात आहेत.

अधिक संसर्गजन्य

कोरोनाच्या मूळ विषाणूमध्ये सातत्याने उत्परिवर्तन होत असते. दुसरी लाट डेल्टा या विषाणूमुळे, तर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे तिसरी लाट आली होती. यामध्ये बीए-1 आणि बीए-2 चे प्रमाण अधिक होते. आता त्यामध्ये आणखी उत्परिवर्तन झाले असून, त्यापासून बीए-4 आणि बीए-5 हे दोन विषाणू तयार झाले असून, ते अधिक संसर्गजन्य आहेत. त्यामुळेच पुण्यात आढळलेल्या या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

मुंबईत आढळले 330 नवे रुग्ण (Corona)

मुंबईत शनिवारी 330 नवे रुग्ण आढळले. यातील 20 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांना ऑक्सिजनची गरज भासली. दिवसभरात 8583 कोरोना चाचणी करण्यात आली. राज्यभरात शनिवारी 529 रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या 2772 वर पोहोचली आहे.

Back to top button