

चाफळ : पुढारी वृत्तसेवा : चाफळ (ता. पाटण) येथील श्रीराम मंदिराच्या उत्तर बाजूने वाहणार्या उत्तर मांड नदीला मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. या महापुरामुळे पात्रालगत मोठे नुकसान झाले होते. तसेच या परिसरातील काही घरांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळेच या परिसरासह पुरातन बुरूजांची डागडुजी करण्यासाठी निधी मिळणे आवश्यक आहे.
चाफळसह परिसरात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या महापुरामुळे नदीच्या पात्रात असलेल्या दोन पुरातन बुरूंजाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.गावाला पाणी पुरवठा करणारी नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीत देखील पुराचे पाणी गेल्याने पाणी
दुषित झाले होते. त्यामुळे विहिरीच्या बाजूने मोठी संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे. दरवर्षी उत्तमांड नदीला येणार्या पुरामुळे श्रीराम पेठेतील नदीकडेला असलेल्या घरांकडे तसेच दुकानांकडे नदीचे पात्र सरकू लागल्याने धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे नदी पात्राकडेला असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे देखील नदीचे पात्र सरकू लागले आहे.
नदीच्या पात्रात असलेल्या महादेव मंदिरास चारी बाजूंनी पाण्याचा दरवर्षी विळखा असतो. नदीकडेला असलेल्या मानवी वस्तीतील घरांना देखील पाण्याचा विळखा पडतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन श्रीराम देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष पवार यांनी महादेव मंदिर ते बस्थानकापर्यत संरक्षण भिंतसाठी तसेच नवीन फरशी पुलासाठी निधी मिळावा म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
गृहराज्यमंत्री, खासदारांनी लक्ष घालावे …
खासदार श्रीनिवास पाटील, राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून महापुरामुळे स्थानिकांना होणारा धोका दूर करण्यासाठी लक्ष घालावे. तसेच नदी पात्रालगत संरक्षक भिंतीला तातडीने निधी मिळावा, अशी मागणी होत आहे.