राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव, दिवंगत समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे सहाय्यक, भाई वैद्य, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी यांच्या लोकसभा निवडणुकांचे प्रचारप्रमुख, फर्डे वक्ते, बूथ कमिटी संकल्पनेचे जनक, काँग्रेसचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते, अशी भीमराव पाटोळे यांची ओळख. महापालिकेच्या चुरशीच्या ठरलेल्या दोन निवडणुका त्यांनी लढविल्या. त्यांच्या कायमच्या स्मरणात राहिलेल्या या निवडणुकांची आठवण त्यांच्याच शब्दात...
भीमराव पाटोळे
शिक्षणासाठी लहानपणीच मी घोरपडे पेठेतील भावाकडे रहायला आलो. त्यावेळी घोरपडे पेठेत राष्ट्रसेवा दलाचे आणि समाजवादी पक्षाचे चांगले काम सुरू होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनेही चांगलाच जोर धरला होता. समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते एस. एम. जोशी या चळवळीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या तडफदार कामाने प्रभावित होऊन मी समाजवादी पक्षाकडे आकर्षित झालो. दिवंगत नेते भाई वैद्य यांनी माझ्याकडे राष्ट्रसेवा दलाच्या घोरपडे पेठेतील शाखेच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. त्यामुळे मी सामाजिक काम, पक्ष संघटन आणि निवडणुकांच्या नियोजनात सहभागी होऊ लागलो. माझ्या कार्यशैलीमुळे कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत होत होते. परिणामी, त्यावेळी आलेली विधानसभेची (1967) निवडणूक मी लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. परंतु, त्यावेळी पक्षाने आरपीआयबरोबर युती केल्याने सर्व राखीव जागा त्यांना देण्याचा निर्णय झाला. परिणामी मला तिकीट मिळू शकले नाही. नंतर लोकसभेच्या निवडणुका लागल्या. या निवडणुकीत एस. एम. जोशी यांच्यासाठी मी घरोघर फिरून काम केले. त्यामुळे एक चांगला कार्यकर्ता म्हणून पक्षात माझी चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. त्यामुळे 1968 मधील महापालिका निवडणुकीसाठी संयुक्त समाजवादी पक्षाकडे मी उमेदवारी मागितली.
निवडणुका लढविण्यासाठी पैसे कसे उभे करायचे? हा मोठा प्रश्न त्याकाळी पडत असे. त्यामुळे निधी उभारणीसाठी मधुकर निरफराके यांनी दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्याकडे साकडे घालायचे ठरविले. निळूभाऊंचा ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. निरफराके यांनी निळूभाऊंची भेट घेऊन निवडणूक निधी उभारणीसाठी ‘कथा अकलेच्या काद्यांची’ या वगनाट्याचे प्रयोग करावेत, अशी विनंती केली. त्यानुसार त्यांनी भाई वैद्य, मधुकर निरफराके आणि माझ्यासाठी, असे मिळून तीन प्रयोग करण्याचे मान्य केले. तीन ठिकाणी झालेले हे प्रयोग हाऊसफुल्ल झाले. यातून मला निवडणुकीसाठी 1800 रुपयांचा निधी उपलब्ध झाला. घोरपडे पेठेतील 200 तरुण कार्यकर्ते माझ्यासाठी अहोरात्र झटत होते. मात्र, अखेरच्या क्षणी माझे नाव मागे पडून अंबादास मोरे या कार्यकर्त्याला पक्षाने तिकीट दिले. त्यामुळे कार्यकर्ते निराश झाले. पक्षाकडून झालेल्या या अन्यायामुळे ते चिडले आणि त्यांनी मला पक्षाचा राजीनामा द्यायला लावून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास भाग पाडले.
एस. एम. जोशी यांच्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी होता. मीच उमेदवार, मीच वक्ता आणि निवडणुकीचे नियोजनही मीच करायचे, अशा साऱ्याच आघाड्यांवर लढताना माझी चांगलीच दमछाक होत होती. अशा परिस्थितीतही शेकडो कार्यकर्त्यांबरोबर जनतेचा मोठा पाठींबा होता. घोरपडे पेठ युवक आघाडी या नावाने मी ही निवडणूक लढविली. काँग्रेसचा उमेदवार, नागरी संघटनेचे अंबादास मोरे आणि अपक्ष मनीलाल ओसवाल हे माझ्यासमोर होते. काँग्रेसने आपल्या उमेदवारासाठी खूपच ताकद लावली. काही ठिकाणी बोगस मतदानही करवून घेतले. तर, ओसवाल यांनी मताला तीन रुपयांचा भाव दिला. समाजवादी पक्ष आणि नागरी संघटनेची युती होती. निवडणूक खूपच अटीतटीची झाली. परिणामी या पहिल्या निवडणुकीत माझा 70 मतांनी पराभव झाला.
ऐनवेळी मला डावलण्याच्या निर्णयाचा नेत्यांना पश्चाताप झाला. माझ्या पराभवामुळे भाई वैद्य यांनाही वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर एस. एम. जोशी यांच्या सहाय्यकाची जबाबदारी सोपविली. 1971 च्या लोकसभा निवडणुकीत भाई वैद्य उमेदवार होते. त्यांच्या प्रचारप्रमुखाची जबाबदारी माझ्यावर होती. 1971 च्या बांगला युद्धानंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी या सर्व विरोधकांची दाणादाण उडवून पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.
परिणामी नानासाहेब गोरे यांचा प्रजासमाजवादी व संयुक्त समाजवादी पक्ष एकत्र आले. समाजवादी पक्षाच्या मालवण येथे झालेल्या अधिवेशनात प्रदेश सचिव म्हणून माझी निवड केली गेली. 1974 मधील महापालिकेच्या निवडणुकीत मी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा पदसिद्ध सदस्य होतो. त्यावेळी दिवंगत नेते विठ्ठल तुपे, तायप्पा भंडारी, सयाजी साळुंखे यांना मी पक्षाची तिकिटे दिली. तर मी स्वतः नागरी संघटनेचा उमेदवार म्हणून घोरपडे पेठेतून निवडणूक लढविली. पूर्वी याच वॉर्डातून पक्षाने ऐनवेळी उमेदवारी कापल्याने मला अपक्ष लढावे लागले होते. त्यावेळी झालेल्या निसटत्या पराभवामुळे मतदारांची सहानुभूती मिळत होती. काँग्रेसने विठ्ठल लडकत यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीसाठी देशभरातून पक्ष निधी आला. निवडणूक खूपच अटीतटीची झाली. माझ्यासाठी तरुण कार्यकर्ते झटत होते. निवडणूक माझ्या बाजूने झुकत असल्याचे एलआयबीचे रिपोर्ट्स होते. वर्तमानपत्रातही तशा आशयाच्या बातम्या येत होत्या.
घोरपडे पेठ वसाहत तर माझा बालेकिल्ला होता. निवडणुकीचे हे बदलते चित्र पाहून लडकत सावध झाले आणि त्यांनी ‘लक्ष्मी दर्शन’ सुरू केले. त्यामुळे 100-200 मतांनी निवडणूक हातून जाते की काय? असे कार्यकर्त्यांना वाटू लागले. एका व्यापारी मित्राने तर आपणही पैसे वाटू या, असा सल्ला दिला. पण मी नकार दिला. आपण वॉर्डात भरपूर काम केले आहे, मी स्थानिक तर लडकत बाहेरचे हे लक्षात घेऊन मतदार आपल्याच पारड्यात मते टाकतील, असा विश्वास वाटत होता. त्यातच ज्येष्ठ संपादक श्री. ग. मुणगेकर, निळूभाऊ लिमये यांनी माझ्यासाठी घोरपडे पेठ पोलिस चौकीसमोर प्रचाराची मोठी सभा घेतली. एस.एम. जोशींनीही माझे कौतुक करत मी निवडून येणार, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे चांगली वातावरणनिर्मिती झाली होती. कार्यकर्त्यांनाही हुरूप आला होता. त्यामुळे ते आणखी जोमाने काम करत होते.
दुसरीकडे लडकत यांचे पैसेवाटप सुरूच होते. काही कार्यकर्ते त्यांच्या प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी लडकत यांच्या भावाला पैसे वाटताना पकडलेही होते. पण ते शिताफीने कार्यकर्त्यांच्या हातून निसटले. या निवडणुकीत अवघ्या सव्वाशे मतांनी माझा पराभव झाला. माझ्या पराभवाने माझ्याबरोबरच अनेकांना धक्का बसला. कित्येकांना अश्रू आवरणेही कठीण गेले. माझ्या पराभवाचे विश्लेषण करताना काही वर्तमानपत्रांनी तर ‘भीमराव पाटोळेंसारखे कार्यकर्ते सभागृहात असायला हवे होते,’ अशा बातम्याही दिल्या होत्या.
(शब्दांकन : सुनील कडूसकर)