

प्रभाग क्रमांक : 30 कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी
गत महापालिका निवडणुकीत कर्वेनगर या जुन्या प्रभागातून भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला होता. आता कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी या नव्या प्रभागरचनेत बहुतांशी जुनीच भौगोलिक रचना कायम ठेवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रभागात भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा फायदा या प्रभागात भाजपला होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी या प्रभाग क्र. 30 मध्ये वारजे, आकाशनगर, तिरुपतीनगर, श्रीराम सोसायटी, कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी, गोसावी वस्ती, स्पेन्सर चौक, कर्वेनगर गावठाण, राजाराम पूल तसेच शाहू कॉलनी, दुधानेनगर, इंगळेनगर आदी भागांचा समावेश आहे. यात काही प्रमाणात वसाहत भागासह सोसायट्यांचा परिसर मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. या प्रभागात ‘अ’ गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‘ब’ आणि ‘क’ गटांत सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि ‘ड’ गटात सर्वसाधारण प्रवर्ग, अशी आरक्षणे पडली आहेत.
कर्वेनगर प्रभागात 2017 मधील निवडणुकीत भाजपचे सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी दुधाने हे चार नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या रोहिणी भोसले यांना 581 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा बराटे, विनोद मोहिते आणि विजय खळदकर यांना दोन नंबरची मते मिळाली होती. यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
या प्रभागात भाजपचे वर्चस्व आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढविल्यास आगामी निवडणुकीत अटीतटीचा सामना होणार असून, या प्रभागात परिवर्तन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र लढल्यास मतांची विभागणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने या शरद पवार गटात सामील झाल्याने मतांची विभागणी होणार आहे.
भाजपकडून राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी या तीन माजी नगरसेवकांसह तसेच महेश पवळे, मानसी गुंड, विनोद मोहिते, जयदीप पारखी, एकता रामदासी हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लक्ष्मी दुधाने, स्वप्निल दुधाने, प्रमोद शिंदे, नीता शिंदे, किशोर शेडगे, विष्णु सरगर यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) तेजल दुधाने, प्रवीण दुधाने, रेश्मा बराटे, मोहित बराटे, संगीता बराटे, आनंद तांबे हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रणव थोरात, अनिकेत जावळकर, प्रतीक्षा जावळकर यांची नार्वे चर्चेत आहे. शिवसेनकडून (ठाकरे गट) अजय भुवड, नंदू घाटे, मयूर वांजळे, जगदीश दिघे, दिनेश बराटे हे निवडणूक लढवू इच्छित आहेत. मनसेकडून सचिन विप्र, शैलेश जोशी, सुरेखा मकवान, संजय नांगरे यांची नार्वे चर्चेत आहेत. तसेच विरेश शितोळे, विजय खळदकर यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
प्रभागाची लोकसंख्या : 76903
अनुसूचित जाती प्रवर्ग : 4276
अनुसूचित जमाती प्रवर्ग : 865