

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या कार्यकाळात विविध विकासकामे मार्गी लावली असली, तरी कर्वेनगर कालवा रस्ता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील वाहतूक कोंडीवर अद्यापही उपायोजना झाली नाही. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानच्या कर्वेनगर डीपी रस्त्याचे कामही भूसंपादनाअभावी रखडल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक ः 30 कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी
प्रदीप बलाढे
या प्रभागाचे नाव पूर्वी कर्वेनगर (क्र. 31) असे होते. नवीन प्रारूप प्रभागरचनेनुसार या प्रभागाचे नाव आता कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी (क्र. 30) असे झाले आहे. 2017-2022 या कालावधीत भाजपचे राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी आणि राष्ट्रवादी काँग््रेासच्या लक्ष्मी दुधाने हे या प्रभागाचे लोकप्रतिनिधी होते. त्यांनी उपलब्ध निधीतून पायाभूत सुविधा, पदपथ, महापालिकेच्या शाळांची दुरूस्ती, प्रशिक्षण केंद्र (लाइट हाऊस), जलतरण तलाव, जलवाहिन्या, सुशोभीकरण, उद्याने, खेळाची मैदाने, महापालिकेचे रूग्णालय, पावसाळी वाहिन्या, रस्त्यांचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण, ड्रेनेज लाइन आदी विकासकामे केली आहेत. मात्र, वाहतूक कोंडी, भाजी मंडई, पार्किंग व्यवस्था, महापालिकेचे प्रशस्त रुग्णालय, कर्वेनगर रस्त्यावरील अतिक्रमणे आदी प्रश्न आजही कायम आहेत.
कर्वेनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येकडे माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या रस्त्याचा महत्त्वाचा भाग असलेला राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानचा डीपी रस्ता भूसंपादनअभावी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. महापालिकेच्या पथ विभागाने जेवढी जागा ताब्यात आहे, तेवढाच रस्ता तयार केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याचा वापर करता येत नाही. दुसरीकडे महापालिकेने सनसिटी ते कर्वेनगरदरम्यान नदीवर नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कर्वेनगरमधील काही सोसायट्यांमधील नागरिकांनी नवीन पूल सुरू करण्यापूर्वी रखडलेल्या डीपी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिवणे ते खराडीदरम्यान रस्त्याचे नियोजन केले आहे. मात्र, भूसंपादनामुळे या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षे रखडले असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे प्रभागात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नदीपात्रातील खराडी-शिवणेदरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण केल्यास मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 100 फूट रूंद असलेल्या या डीपी रस्त्याचे काम शिवणे ते म्हात्रे पूल (6 किलोमीटर), तसेच म्हात्रे पूल ते संगमवाडी (5 किलोमीटर) आणि संगमवाडी ते खराडी (11.50 किलोमीटर), अशा एकूण तीन टप्प्यांमध्ये होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी
कर्वेनगर कालवा रस्त्यावरील वाहतुकीची समस्या जटिल
शिवणे ते खराडी दरम्यानच्या डीपी रस्त्याचे काम रखडले
पावसाळ्यात कर्वेनगर येथील उड्डाणपुलालगत साचणारे पाणी
भाजीमंडई आणि वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थेचा अभाव
जावळकर उद्यान ते डॉ. आंबेडकर चौक डीपी रस्ता रखडला
कचरा व्यवस्थापनाबाबत योग्य नियोजनाचा अभाव
कर्वेनगर कालवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार कधी?
शिवणे-खराडी रस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष का?
राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यानचा डीपी रस्त्याचे काम होणार कधी?
कर्वेनगर रस्त्यावरील अतिक्रमणे का वाढली?
कर्वेनगर उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात पाणी का साचते?
छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल
योगा केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र
ग््रांथालय, खुले पुस्तक घर
अग्निशमन केंद्र, उद्याने, जॉगिंग ट्रॅक
पाणीपुरवठा योजना
राजाराम पूल ते पाणंद रस्त्याचे रुंदीकरण
कर्वेनगर येथील उड्डाणपूल
श्री दत्त दिगंबर कॉलनी येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडांगण, उड्डाणपूल, ’एमएनजीएल’ची लाइन, जलतरण तलाव यासह विविध विकासकामे केली आहेत. उद्याने, आरोग्य केंद्र, विविध कोर्सेस शिकण्यासाठी प्रशिक्षण केंद्र (लाइट हाऊस) उभारले आहे. रखडलेला डीपी रस्ता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
सुशील मेंगडे, माजी नगरसेवक
डीपी रस्ता होण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच डीपी रस्त्यावरील जागा मालकांना जागेचा मोबदला देण्यासाठी 100 टक्के टीडीआर देण्याची मान्यता आणली. प्रभागात अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल, क्रीडा संकुल, ग््रांथालय, योगा केंद्र, इंगळेनगर येथील आरोग्य केंद्र आदी विकासकामे केली आहेत.
लक्ष्मी दुधाने, माजी नगरसेविका
कर्वेनगर, वारजे, शिवणे भागासाठी अग्निशमन केंद्र उभे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वारजे हायवे चौकादरम्यान मोठ्या व्यासाची पावसाळी वाहिनी आणि ड्रेनेज लाइनचे काम केले आहे. मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पातील जागा मालकांना मोबदला मिळवून देऊन ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करून दिली.
वृषाली चौधरी, माजी नगरसेविका
कर्वेनगर येथे आरोग्य केंद्र सुरू केले आहे. पदपथ, रस्ते, ड्रेनेज, पावसाळी वाहिन्या आदी विकासकामे केली आहेत. कर्वेनगर येथील सम्राट अशोक शाळा नव्याने बांधली आहे. डुक्कर खिंड डीपी रस्ता आणि कर्वेनगर डीपी रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
राजाभाऊ बराटे, माजी नगरसेवक