मंचर : पुढारी वृत्तसेवा
आधी अस्मानी संकटाने झालेले नुकसान आणि आता घसरलेले बाजारभाव यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. सध्या किलाेला केवळ ४० ते ५० रुपये मिळत असल्याने त्यातून उत्पादन खर्चही निघेनासा झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून, द्राक्षबागा ताेडण्याच्या मनस्थितीत ताे असल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यात दिसत आहे.
तालुक्यातील कळंब, चांडाेली, महाळुंगे पडवळ, नागापूर, लाैकी, नांदुर, विठ्ठलवाडी आदी गावांमध्ये जवळपास ३०० एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष बागा आहेत. शेतकऱ्यांनी कळंब जम्बाे, शरद, नाना पर्पल, रेड ग्लाेब अशा विविध प्रकारच्या द्राक्ष बागा लावल्या आहेत. कळंब येथील शेतकरी अनिल कानडे यांची द्राक्षे एक्सपाेर्टसाठी रेयान प्रा. लि. कंपनीतर्फे थायलंड, पश्चिम बंगाल, दुबई, श्रीलंका, मलेशिया येथे पाठविली जातात. द्राक्ष बागायतदार गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनामुळे आणि यावर्षी अवकाळी पाऊस व पडलेले बाजारभाव यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.
द्राक्ष बाग पिकवण्यासाठी औषध फवारणी आणि मजुरीसह एकरी अंदाजे चार ते पाच लाख रुपये खर्च येताे. द्राक्ष बागेत सुरुवातीला एकरी दहा टन उत्पन्न निघत हाेते. निसर्गाच्या लहरीपणाचा द्राक्ष बागायतदारांना फटका बसला. सद्य:स्थितीत एकरी सहा ते सात टन उत्पादन निघत आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे भांडवलसुद्धा वसूल हाेत नाही. द्राक्ष बागायतदार निराश झाले आहेत. मध्यंतरीच्या अवकाळी पावसाच्या नुकसानीतून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी लाखाे रुपयांची औषधे फवारणी करावी लागली.
दाेन वर्षांपूर्वी द्राक्षाला 100 ते 125 रुपये बाजारभाव हाेता. यावर्षी एक्सपाेर्ट दर्जाच्या द्राक्षांसाठी प्रतिकिलाे 70 ते 80 रुपये आणि घाऊक बाजारात 40 ते 50 रुपये बाजारभाव मिळत आहे. बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे.
कळंब परिसरामध्ये एक एकरपासून पाच एकरपर्यंत द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत. त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमाेद कानडे, भीमाशंकर कारखाना संचालक रमेश कानडे, अनिल कानडे, नीलेश कानडे, महेंद्र कानडे, अर्जुन कानडे, विष्णू कानडे, विनाेद थाेरात, प्रवीण थाेरात, तुषार थाेरात असे अनेक द्राक्ष बागायतदार आहेत. नागापूर येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी रेड ग्लाेब या जातीच्या द्राक्षांचे माेठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले असले तरी बाजारभावाची साथ मिळत नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. कित्येक बागायतदारांनी तर द्राक्षबागा काढून ऊस शेतीची लागवड केलेली आहे.
शासनाने स्वामीनाथन आयाेग लागू करून शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांना हमीभाव देणे गरजेचे आहे. जेणेकरून निसर्गाच्या लहरीपणामुळे हाेणारे नुकसान भरून येण्यास मदत हाेईल.
– प्रमाेद कानडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य