पुणे : पॅकेज्ड स्नॅक्स, शीतपेये, इन्स्टंट नूडल्ससारख्या अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाकडे ’जेन झी’चा कल वाढत आहे. त्यामुळे लहान वयातच लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार असे आजार वाढत असल्याचे स्पष्ट निरीक्षण आर्थिक सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. अशा अन्नपदार्थांवर सर्वाधिक जीएसटी, पोषणमूल्यांवर आधारित कर प्रणाली आणि त्यांच्या जाहिरातींवर नियंत्रण आणण्याची शिफारस शासनस्तरावर करण्यात आली आहे. दुसरीकडे, पालकांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण नुकतेच संसदेत सादर करण्यात आले. सर्वेक्षणानुसार भारतात अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक, सकस आणि घरगुती आहार मागे पडत आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असून, लहान वयातच जीवनशैलीशी संबंधित आजार वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पाच वर्षांखालील मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण 2015-16 मध्ये 2.1 टक्के होते, ते 2019-21 मध्ये 3.4 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 2020 मध्ये सुमारे 3.3 कोटी मुले लठ्ठपणाच्या श्रेणीत होती. ही संख्या 2035 पर्यंत 8.3 कोटींवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या आहारावर अधिक लक्ष देण्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
आकडे काय सांगतात?
आर्थिक सर्वेक्षणातील आकडेवारी चिंताजनक चित्र दाखवते.
भारतात अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाची किरकोळ विक्री 2006 मध्ये सुमारे 0.9 अब्ज डॉलर होती, ती 2019 मध्ये जवळपास 38 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे, म्हणजे जवळपास 40 पट वाढ झाली आहे.
2009 ते 2023 या काळात बाजाराचा विस्तार 150 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
प्रोसेस्ड अन्न आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नात फरक काय?
प्रोसेस्ड अन्न म्हणजे मर्यादित प्रक्रिया केलेले अन्न - जसे दही, चीज, साठवण्यासाठी प्रक्रिया केलेल्या डाळी किंवा भाज्या.
अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाचा टिकाऊपणा वाढण्यासाठी जास्त प्रमाणात साखर, मीठ, चरबी, कृत्रिम रंग, फ्लेवर आणि संरक्षक पदार्थ वापरलेले असतात. पॅक्ड चिप्स, बिस्किटे, केक, शीतपेये, इंस्टंट पदार्थ, सहा महिने-वर्षापर्यंत टिकणारे रेडी टू कूक पदार्थ हे त्याची ठळक उदाहरणे आहेत.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
मुलांना शक्यतो घरचे ताजे अन्न द्यावे.
पॅकेटवरील घटक वाचण्याची सवय लावावी.
शीतपेये, चिप्स, गोड पदार्थ रोजच्या आहारातून टाळावेत.
महिन्याच्या किराणा सामानात अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नाचा समावेश टाळावा.
मुलांना आरोग्याचे धोके समजावून सांगावेत.
खेळ, व्यायाम आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन
आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधनानुसार अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाचे नियमित सेवन केल्यास हृदयविकार, मधुमेह आणि अकाली मृत्यूचा धोका वाढतो. भारतात गेल्या काही वर्षांत अशा अन्नाची विक्री वाढल्याने आरोग्यव्यवस्थेवरील ताणही वाढत असल्याचे अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नातील साखर आणि मीठ शरीरातील चयापचय बिघडवते. त्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह लवकर उद्भवतो. लहान मुलांमध्ये पॅक्ड अन्नाची सवय आरोग्यास घातक आहे. घरचे ताजे अन्न हीच त्यांच्या भविष्यासाठीची खरी गुंतवणूक आहेडॉ. अनिल कुलकर्णी, मधुमेहतज्ज्ञ
अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नात पोषणमूल्ये कमी आणि उष्मांक जास्त असतो. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो, टाईप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. मुलांमध्ये थकवा आणि एकाग््रातेचा अभाव जाणवतो. दीर्घकाळ सेवन केल्यास मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.डॉ. स्नेहा देशपांडे, बालरोगतज्ज्ञ