

नारायणगाव : येडगाव (ता. जुन्नर) धरण जलाशयात असलेल्या इंदिरानगर परिसरातील सुमारे 40 कृषी वीजपंपांच्या सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या. या भागात सातत्याने केबल चोरी होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान, नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
येडगाव ग््राामपंचायत हद्दीतील येडगाव धरण जलाशय परिसरात शेतकऱ्यांच्या सुमारे चारशे ते पाचशे कृषी उपसा जलसिंचनाचे कृषी पंप आहेत. एका कृषी पंपाला सुमारे शंभर ते दीडशे मीटर लांबीची केबल जोडलेली असते. पंधरा दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरातील दहा ते बारा कृषी पंपांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर शनिवारी (दि. 7) मध्यरात्री ते रविवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास इंदिरानगर, खंडोबा माळ परिसरातील शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत.
यात शरद नेहरकर, राजू नेहरकर, राजेंद्र गावडे, विकास गावडे, पप्पू गावडे यांच्यासह तीस शेतकऱ्यांच्या सुमारे 40 कृषी वीजपंपांच्या केबल आज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पोलिसांनी केबल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भाजीपाला पिकांना बाजार नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या केबल चोरीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केबल चोरीची तक्रार शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. यापूर्वी झालेल्या केबल चोरीच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दिल्या आहेत. मात्र, चोरट्यांचा शोध पोलिसांना अद्याप लावता आला नाही. केबलमधील तांब्याची तार काढून चोरटे भंगारात विक्री करतात. त्यामुळे चोरीच्या तांब्याची तार खरेदी करणाऱ्यांचाही शोध लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सततच्या केबल चोरीमुळे शेतीव्यवसाय अडचणीत सापडला आहे. केबल चोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पुन्हा केबलची चोरी झाल्यास नारायणगाव पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच गुलाबराव नेहेरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.