

निमोणे : अतिशय चुरशीच्या झालेल्या शिरूर ग्रामीण - न्हावरे जि.प. गटाचा निकाल हा उत्सुकता वाढविणारा आहे. दोन्हीही बाजूकडून सगळ्या आयुधांचा मुक्त हस्ते वापर झाल्याने निकालाबाबत दोन्ही बाजूंकडून जोरदार दावे केले जात आहेत. परंतु, क्रॉस वोटिंगमुळे निकालाचे संदर्भ बदलू शकतात, अशीही जोरदार चर्चा आहे.
शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाती घावटे व भाजपच्या उज्ज्वला भोस अशी सरळ लढत झाली. घावटे आणि भोस हे दोन्हीही दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे बोट धरूनच सार्वजनिक जीवनात आल्यामुळे या पंचायत समिती गणात दोन्ही बाजूकडून जिल्हा परिषदेला जे मतदान झाले त्यामध्ये मालती बाबूराव पाचर्णे यांच्या पारड्यात झुकते माप मिळाल्याची चर्चा आहे. शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणात रामलिंग, अण्णापूर, कर्डीलवाडी, लंघेवाडी, चव्हाणवाडी आदी परिसरात घड्याळाची टिकटिक वाढलेली दिसली.
निमोणे, मोटेवाडी, गोलेगाव, तर्डोबाची वाडी आदी ठिकाणी कमळाचा जोर दिसून आला. या पंचायत समिती गणात भाजपचा जिल्हा परिषदेचा उमेदवार निर्णायक आघाडी घेऊ शकतो, अशीही चर्चा आहे. न्हावरे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार वृषाली वाळके या त्यांच्या स्वतःच्या करडे गावात निर्णायक आघाडी घेतील, असे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षापासून तालुकाध्यक्षापर्यंत सगळेच कारभारी या गटात असल्याने त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
न्हावरे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक कोहकडे यांनी भाजपचे उमेदवार सागर खंडागळे यांच्यापेक्षा भरीव आघाडी घेतल्याचे बोलले जात असले, तरी त्यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद उमेदवार वृषाली वाळके यांना कितपत फायदा झाला, हे मतमोजणीनंतरच उघड होणार आहे. या निवडणुकीत पैसा फॅक्टर बरोबरच सहानुभूती व काहीच दिवसांवर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचाही प्रभाव जाणवला.
गावपातळीवर आपली मांड ठोकायची असेल, तर आपण आपला गट मजबूत करायचा, या भावनेने निवडणुकीच्या अंतिम रात्री जे काय उधळायचे असते, ते करताना कुणी नाराज होऊ नये, याची काळजी गाव पातळीवरील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी चोख बजावल्याचे समजते. या निवडणुकीत अनेकांचे चेहरे आणि मुखवटे वेगवेगळे असल्याचे मतदानाच्या पूर्वसंध्येला उघड झाल्याने जिल्हा परिषदेच्या निकालापेक्षा शिरूर ग्रामीण पंचायत समितीचा निकाल काय लागतो, यावर जोरदार खल सुरू झाला आहे.