पुणे : पुढारी वृत्तसेवा : गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा गदिमा पुरस्कार अभिनेते आणि नाम फौंडेशन मार्फत दुष्काळग्रस्तांना मदत करणारे नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. या पुरस्काराबरोबरच गृहिणी सखी सचिव पुरस्कार निवेदिता जोशी-सराफ यांना, चैत्रबन पुरस्कार संगीतकार कौशल इनामदार यांना, तर स्व. विद्या माडगूळकर यांच्या समरणार्थ दिला जाणारा विद्या प्रज्ञा पुरस्कार नवोदित गायिका रश्मी मोघे याना प्रदान करण्यात येणार आहे. या बरोबरच शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त 13 विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे होणार आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर गदिमांचे कनिष्ठ बंधू स्व. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ रश्मी मोघे व सहकारी माझी आवडती गदिमा गीते सादर करणार असल्याचे माडगूळकर यांनी सांगितले.
हेही वाचा