Pune Election Campaign Strategies: Pudhari
पुणे

Pune Election Campaign Strategies: निवडणुकीत मतांसाठी काय वाट्टेल ते! 'पैसा-बिर्याणी' पासून ते 'कुकरच्या झाकणां'पर्यंत; वाचा प्रचाराच्या नाना तऱ्हा...

राजकारण्यांकडून 'शक्तीप्रदर्शन' आणि मतदारांकडून 'सोसायटी रंगवून देण्याची' मागणी; डिजिटल प्रचारातही 'रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा' घोषणेचा दबदबा.

पुढारी वृत्तसेवा

‌‘मतं मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करीन..., कार्यकर्त्यांना बिर्याणी चारीन..., परगावी गेलेल्यांना धरून आणीन..., पैसा पाण्यासारखा खर्चीन..., मतदारांच्या पाया पडीन... पाच-पाच मजले न दमता चढीन... देवस्थानाला कौल लावीन...‌’

सुनील माळी

एकदा मोठ्या पक्षाचं तिकीट जाहीर झालं की, मग कार्यकर्त्याचा होतो उमेदवार आणि मग त्याच्या अंगात येतं. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी तो कंबर कसतो. अर्थात त्याच्या समोरचा उमेदवारही तितक्याच तयारीत असल्याने त्यांची झुंज सुरू होते, मतदारांपर्यंत पोचण्याची धडपड रंगते. ‌‘मतामतांचा गलबला...‌’ असं समर्थ रामदास स्वामी वेगवेगळ्या पंथीयांच्या विचारांबाबत म्हणाले असले तरी महापालिकेच्या निवडणुकीत मात्र मलाच मतं मिळाली पाहिजेत, असा गलबला सर्वच उमेदवारांकडनं सुरू होतो.

उमेदवारांची खरी सुरुवात झालेली असते ती उमेदवारी अर्ज भरण्यापासनंच. उमेदवारीसाठी पक्षापुढं मुलाखत देताना कार्यकर्त्यांकडनं जसं शक्तिप्रदर्शन केलं जातं, तसंच शक्तिप्रदर्शन उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतही होतं. उमेदवारी अर्ज भरायला जाताना कार्यकर्ते, बाया-बापड्या, तरुण पोरं यांची लांबलचक मिरवणूक काढली जाते. कुणाची मिरवणूक मोठी, या प्रश्नाच्या उत्तरावरून राजकीय निरीक्षकांचे अंदाजही सुरू होतात. जेव्हा छोटे वॉर्ड होते, तेव्हा फुले पेठेतल्या एका उमेदवाराने त्या छोट्या वॉर्डात जिंकायला जेवढी मते लागत होती, जवळपास तेवढे जण एका मिरवणुकीत आणले होते. त्यामुळं ती मिरवणूक पाहिल्यानंतर लगेचच जाणकारांची प्रतिक्रिया आली... ‌‘ही अर्ज भरण्याची नव्हे तर विजयाचीच मिरवणूक होती...‌’

एखाद्या पक्षाच्या मागे हमखास राहणाऱ्या भागांमधून त्याच पक्षाचे तिकीट मिळणे, म्हणजे उमेदवाराने अर्धा गड जिंकल्यासारखेच..., मात्र अजून अर्धी लढाई बाकी असते, याचे भान असणारा आणि मतांसाठी काय वाटेल ते करण्याची तयारी असलेला उमेदवारच महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी घेतो. याउलट पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतरही नाऊमेद न होता दुसऱ्या पक्षाचा टिळा लावणारा किंवा बंडखोरीचा झेंडा हाती घेणारा अशा काही धूर्त राजकीय चाली रचत थेट लोकांपर्यंत जातो.

मतं मिळवण्यासाठी उमेदवार करत असलेल्या युक्त्या-क्लृप्त्या पाहिल्या की आपण थक्क होतो. सुरुवातीला त्या वॉर्ड-प्रभागातली तरुण मंडळं पॅक केली जातात. गणपतीच्या मूर्तीला चांदीचं मखर, दागिने चढवले जातात. खेळाच्या टीमना बॅटी-बॉल-पॅडचे सेट भेटीदाखल दिले जातात. ही सुरुवात काही उमेदवारी जाहीर झाल्यापासून होत नाही, तर आपण पक्षाच्या अधिकृत तिकिटावर उभं राहिलो नाही तरी अपक्ष म्हणून लढणारच आहोत, याचा निर्धार झालेल्या रणवीरांकडनं आधीच्या वर्षापासनंच होते.

निवडणुकीच्या आधीच्या गणेशोत्सवात मंडळांची चांदी होते. नवरात्रीत तुळजापूर-कोल्हापूर अशा देवीच्या स्थानांवर भक्तगणांना नेण्यासाठी आरामबसची रांग धावू लागते. कुठे कोण अष्टविनायकाचं दर्शन घडवतो, तर कोण रेल्वेनं थेट काशीयात्राच घडवतो... दिवाळीत अत्तर-उटणी-घडीच्या कंदिलाचे पॅकेट घरोघर वाटले जातात, स्वस्त लाडू-चिवड्याचे स्टॉल सजतात, दिवाळी पहाटचे शेकडो कार्यक्रम इच्छुकांकडनं आयोजित होत असल्याने कलावंतही रात्रीचा-पहाटेचा दिवस करून सुगी साधतात. प्रभागातील ओपन जागी संधी नाही मिळाली, तर महिला राखीव जागा तरी मिळेल, या आशेने आपल्याबरोबरच आपल्या बायकोचेही फोटो चौकाचौकांत झळकतात आणि त्यातून दिवाळीच्या नम शुभेच्छा दिल्या जातात.

नव्या डिजिटल जमान्याशी बहुतेकांनी जुळवून घेतलेलं दिसू लागलं. सोशल मीडियाचा वापर करून आपल्या फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. फेसबुक-इन्स्टाग््राामवरनं मतदारांशी संपर्क साधला जाऊ लागला. व्हॉट्‌‍स ॲपवर वेगवेगळ्या भागांतील मतदारांचे ग््रुाप करून त्यावरून ‌‘आज पाणी येणार नाही‌’, ‌‘लाईन फुटल्याने दुरूस्ती सुरू आहे‌’, ‌‘मतदार नोंदणीसाठीचे पत्ते पाहा‌’, ‌‘तुमच्या मतदार नंबरसाठी पुढील लिंक उघडा‌’ आदी सेवा उमेदवारांनी सुरू केल्या.

‌‘उमेदवार पैसे वाटतात‌’, अशी टीका सुशिक्षित वर्गाकडून केली जाते आणि हा वर्ग अशा उमेदवारांना पाहून नाकं मुरडतो. असं असलं तरी आपल्यावर वेळ आली, तर हाच वर्ग या भष्टाचारात खुशाल सामील झालेला जेव्हा दिसतो तेव्हा धक्काच बसतो. ‌‘आमच्या सोसायटीत कॉर्पोरेशनची बाकं टाकून द्या...‌’, ‌‘आमची सोसायटी रंगवून द्या...‌’, अशा मागण्या याच नाकं मुरडणाऱ्या वर्गाकडनं केल्या जातात आणि सोसायटीतल्या मतदारांच्या संख्येकडं पाहून उमेदवाराकडनं त्या मोठ्या खुशीनं पुऱ्याही केल्या जातात. झोपडपट्टी विभागांत मतदानाच्या आदल्या रात्री पैसे-साड्या वाटल्या जातात, तेव्हा त्या भागांत पाहणी पथकं ठेवा, अशा सूचना होतात. ‌‘रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा‌’, अशा घोषणाही दिल्या जातात. काही वेळा असं वाटप करणारे पकडलेही जातात, मात्र त्यामुळं त्या उमेदवाराच्या उमेदवारीवर गदा आल्याचं अद्यापपर्यंत तरी घडलेलं नाही. अनेक ठिकाणी अशा भागांत दुपारी चारपर्यंत खूपच कमी मतदान होतं आणि उमेदवाराची माणसं त्या भागात फिरली की मग चमत्कार झाल्यासारख्या मतदान केंद्रावर रांगा लागतात.

मध्य पुण्यात एका धनाढ्य व्यापारी उमेदवारानं त्या प्रभागातलं ‌‘रेशन कार्ड दाखवा आणि पाचशे रुपयांची नोट घ्या‌’, अशी योजना राबवली. एका अपक्ष उमेदवाराची खूण प्रेशर कुकर अशी होती. त्यानं मतदानाच्या आधी घरोघर जाऊन प्रेशर कुकरची भांडी वाटली, पण त्यांची झाकणं आपल्याकडेच ठेवली. निवडून आल्यावर झाकणं घेऊन जा, असं सांगत भांडी घेतलेल्या मतदारांच्या मतांची हमी त्यानं घेतली. दुसऱ्या उमेदवाराची मतं खाण्यासाठी काही बोगस अपक्ष उमेदवार उभे करण्याची कला काही जाणकार, ज्येष्ठांना साधलेली असते.

दुसऱ्या उमेदवाराच्या नावासारखेच नाव असलेल्यांना पैसे देऊन उभं केलं जातं, त्यामुळं मतदारांचा गोंधळ उडून प्रतिस्पर्धी मुख्य उमेदवाराला जाणार असलेली काही मतं या अपक्षाकडं वळली जातात. काही वेळा विशिष्ट जाती-धर्मियांची मतं वळवण्यासाठी त्या त्या जाती-धर्मियांचे अपक्ष उमेदवार उभे केले जातात.

...प्रचाराच्या या तऱ्हा कितीही सांगितल्या, तरी

न संपणाऱ्या आणि प्रत्येक निवडणुकीत नवनवे

रूप घेऊन येणाऱ्या...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT