

पुणे: कर्जत शहरातील मिळकतीच्या वादातून गोळीबार करत खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सिद्धार्थ प्रभाकर केंगार (वय २४, रा. वडारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वडारवाडी परिसरात ही कारवाई केली आहे. सिद्धार्थ केंगार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
१ ऑक्टोबरला केंगारने मिळकतीच्या वादातून एकावर हल्ला करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच गोळीबारही केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिद्धार्थ पसार झाला होता. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची झाडाझडती सुरू आहे.
दरम्यान, युनिट दोनचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार व विजयकुमार पवार यांना केंगार हा वडारवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यावरून पथकाने या भागात सापळा रचून त्याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी कर्जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.