पुण्यात दिवसभर वातावरणात अशी धुळीची चादर पसरली होती. इमारतींसह आकाशही झाकोळले होते. 
पुणे

धुळीचे लोट, गार वारे अन् दाट धुक्याने नागरिकांना केले हैराण

अमृता चौगुले

मुंबई / पुणे : पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तानातील कराचीतून आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका रविवारी महामुुंबईला बसला. पुण्यासह अहमदाबाद, कच्छ, सौराष्ट्र या भागांनाही या वादळाने तडाखा दिला. धुळीच्या वादळाचे सावट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किनारपट्टीवर पडले. यामुळे देवगडमधील नौकाही मासेमारीसाठी न जाता देवगड बंदरात थांबल्या आहेत.

पुण्यात धुळीचे लोट

रविवार पुणेकरांसाठी त्रासाचाच ठरला. सकाळपासूनच वार्‍याचा वेग प्रचंड वाढल्याने धुळीचे लोट उठत होते. त्यात चहूबाजूंनी दाट धुक्याने वेढल्याने दिवसभर गारठा शहरात जाणवत होता. त्यामुळे दिवसभर गरम चहा अन् शेकोटीवर हात गरम करीत पुणेकरांनी रविवार घालवला.

उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाल्याने तिकडे दाट धुके अन् शीतलहरी वाहत आहेत, त्या महाराष्ट्रात अति वेगाने येत आहेत. कारण पाऊस थांबून वातावरण कोरडे झाले. पुणे शहरावरदेखील या वातावरणाचा परिणाम रविवारी दिसून आला. सकाळी काही काळ सूर्यदर्शन झाले, मात्र शहराभोवती दाट धुके हाते. आकाशा ढगांचीही गर्दी होती. गार बोचर्‍या वार्‍याने नागरिक हैराण झाले होते. सकाळी मार्निंग वॉकला जाताना स्वेटर टोपीसह लोक बाहेर पडले. मात्र, दुपारी 12 नंतर पुन्हा सूर्य गायब झाला अन् बोचरे वारे सुरू झाले. त्यामुळे अनेक भागांत दिवसा शेकोट्या पेटल्या चहाच्या दुकानांत गर्दी वाढली.

जिल्ह्यात सर्वत्र धुलीकण

धुळीच्या वादळाचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसला आहे. धुळीमुळे संपूर्ण वातावरण प्रदूषित झाले आहे. दिवसभरात अनेक भागात सूर्यदर्शन झाले नसल्यामुळे थंडीतही वाढ झाली आहे.

रविवारी (दि. 23) जिल्ह्यातील सर्वच महामार्गावर गाड्यांचे दिवे चालू ठेवून वाहनचालक गाड्या चालवत होते. जुन्नर शहरातून सहज दिसणारा किल्ले शिवनेरी, लेण्याद्री व परिसरातील डोंगर या वादळामुळे अजिबात दिसत नव्हते. भोर तालुक्यातील रायरेश्वरदेखील या धुलीकणाने अस्पष्ट दिसत होता. पहाटे सर्वांना धुके असल्याचे वाटत होते; मात्र हळूहळू सूर्य दर्शन देऊ लागल्यानंतर हे धुके नसून धुलीकण असल्याचे स्पष्ट झाले. या धुळीचा आरोग्यासह पिकांवरदेखील परिणाम होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड झाकोळले

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रविवार (दि.23) सकाळपासून थंड वारे वाहत होते. त्यातच ढगाळ वातावरण व धुलीकणांमुळे शहर परिसर झाकोळून गेल्याचे चित्र होते. नेहमीप्रमाणे धुके पडले असेल अशा शक्यतेने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना वातावरणातील धुलीकणाचा प्रभाव जाणवला. या वादळामुळे शहर परिसरातील धुलीकणात वाढ झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे.

राज्यात वाढणार थंडीचा कडाका

उत्तरेकडे प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे तेथून थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले आहेत. परिणामी, पुढचे तीन दिवस राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढणार आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ येथील तापमानात तब्बल 4 ते 5 अंश सेल्सिअस इतकी घट होईल, असा अंदाज पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यप यांनी व्यक्त केला.

शहराचे तापमान 9 अंशावर जाणार

शहराचे किमान तापमान रविवारी 17.2 होते. मात्र, आगामी चोवीस तासांत त्यात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शहराच्या किमान तापमानात 25 जानेवारीपासून घट होऊन ते 26 रोजी 10 अंशावर तर 27 रोजी 9 अंशावर खाली जाणार आहे. 29 जानेवारीपर्यंत शहरात गारठा जाणवेल. त्या काळात शहरात दाट धुके अन् किंचित ढगाळ वातावरणही अधून-मधून राहणार आहे.

दमा असणार्‍यांनी काळजी घ्यावी

हवेत पसरलेल्या या धूलिकणांचा त्रास दम्याचा त्रास असणारे, वृद्ध व्यक्ती तसेच श्वसनरोग असलेल्यांना याचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे. अशी आरोग्य समस्या असलेल्या नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्वसनविकार तज्ज्ञांनी केले आहे.
धुळीच्या वादळाचा प्रभाव हा वातावरणात जास्त काळ राहणार आहे. या धुळीमुळे वातावरणात सूक्ष्म धुळीकणांचे विशेषकरून (2.5 पीएम) प्रमाण वाढलेले आहे. हे धुळीकण श्वासाद्वारे फुफ्फुसांत गेल्यास त्यामुळे दम लागणे, कोरडा खोकला लागणे, असे परिणाम दिसून येऊ शकतात. विशेषकरून ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे, वयोवृद्ध आहेत आणि रुग्ण आहेत त्यांना याचा त्रास जास्त जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्वासनविकार तज्ज्ञ डॉ. संजय गायकवाड यांनी केले आहे.

'स्मॉग'चाही धोका

सध्या थंडीचे दिवस आहेत आणि वातावरणात सकाळी धुकंदेखील पाहायला मिळते आहे. या धुक्यामध्ये धुळीकण अडकून राहतात. ज्या वेळी धुळीकण आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढते, त्या वेळी त्याचा स्मॉग तयार होतो आणि ते श्वासनविकाराला आमंत्रण ठरते. त्यातून हे धुळीकण श्वसनावाटे फुप्फुसात जाण्याची भीती असल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, दमा आणि अन्य श्वसनरोग असणार्‍यांसाठी ते अपायकारक ठरू शकते.

कोरोनाच्या रुग्णांना धोका अधिक

कोरोनामध्ये बाधित झालेल्या रुग्णांना विशेष करून फुप्फुस बाधित झालेल्या गंभीर रुग्णांमध्ये या धुळीचा अधिक प्रभाव पडू शकतो. यासाठी ज्यांना याआधी कोरोना होऊन गेला आहे त्यांनी यापासून बचाव करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे आहे. याशिवाय पहाटे धुके असताना फिरायला जाणे टाळने गरजेचे आहे. तसेच, मास्कशिवाय बाहेर पडू नये, स्वेटर, थर्मल आदी गरम कपडे वापरावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

पाऊस थांबल्याने आता वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग वाढताच धुळीचे लोट येत आहेत. उत्तर कोकणातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ते दिसले. याचा अंदाज आम्ही दिला आहे. ते किमान बारा तासांसाठी राहील. अफगाणिस्तानातून येणार्‍या चक्रवाताचा हा प्रभाव नाही, हा लोकल इफेक्ट आहे.
– डॉ. डी. एस. पै, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT