इंदापूर : भिशीचालक नातेवाईकांच्या नावावरील मालमत्ता कशा करणार हस्तगत? | पुढारी

इंदापूर : भिशीचालक नातेवाईकांच्या नावावरील मालमत्ता कशा करणार हस्तगत?

जावेद मुलाणी, पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरातील कोट्यवधींच्या भिशी फसवणूकप्रकरणी आता पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तपास यंत्रणेला सखोल तपास करून अवैध भिशीचालकांची पाळेमुळे शोधावी लागणार आहेत. या चालकांनी फसवणूक करून मिळविलेल्या मालमत्ता शोधून त्यांच्या संपत्तीमध्ये अचानक कशी वाढ झाली, यासह अनेक बाबी शोधाव्या लागणार आहेत. पोलिसांसमोर हे मोठे आव्हान आहे. भिशीधारकांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या १६ अवैध भिशीचालकांवर गुन्हे तर दाखल झाले आहेत. आता गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस काय करणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या भिशीचालकांनी सुरुवातीलाच भविष्यात यात ‘झोलझाल’ करण्याच्या हेतूने नियोजनबद्ध योजना आखून फसवणूक केली आहे. आपल्या नावावरील संपत्ती कधीही पोलीस खाते जप्त करू शकते, याची पूर्वकल्पना असल्याने त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता घेतल्याचे बोलले जात आहे. कधीकाळी अत्यंत फाटक्या आणि एक वेळची पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेले हे भिशीचालक अचानक झटपट श्रीमंत होऊन गेले आहेत.

यांच्या घरातील प्रत्येक लहान, थोरांच्या व महिलांच्याही अंगावर जवळपास पावशेर, अर्धा किलो, किलोभर सोने चकाकत होते. राहायला मोठे बंगले, फिरायला आलिशान चारचाकी, बुलेटसारखी दुचाकी, गळ्यात आणि मनगटात सोन्याचे कडे, हातातील सर्व बोटांत मोठ्या सोन्याच्या अंगठ्या घालून मोठ्या रुबाबात यांच्या कुटुंबातील सदस्य फिरत असत. भिशीच्या गोरखधंद्यातून उभी केलेली बेसुमार मालमत्ता आपल्या जवळच्यांच्या नावावर केलेल्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून या मालमत्ता पोलीस परत घेणार का? याची देखील चर्चा इंदापूर येथील लोकांमध्ये आता रंगू लागली आहे.

भिशीच्या सभासदांना आपला पैसा मोठा होतो आहे, याचाच आनंद होता. त्यामुळे भिशीत किती सदस्य आहेत, किती रकमेची आहे, परतावा किती मिळणार आहे आणि किती वर्षांची आहे, याचा विचार देखील न करता फक्त बोनसच्या आमिषाला बळी पडून वेळेत पैसे मिळत असल्याने तसेच आर्थिक व्यवहार बाजारातील पत म्हणून फक्त एकमेव भिशीतच सारा पैसा भरू लागले.

भिशीचालकाने मग हळूहळू प्रत्येक तारखेला 50 हजारांपासून १ कोटी ते ५ कोटीपर्यंत रक्कम वाढवली आणि हे सर्व गुफ्तगू हळूहळू मोठ्या मायाजालात अडकले. एखाद्या बँकेप्रमाणे भिशीचालकांच्या घरात नोटा मोजायच्या पाच सहा मशिन्स होत्या. काही अगदी दोन-तीन जण वगळता सारा पैसा फक्त रोखीचाच आणि हो पैसा जमा करायला ठराविक ठिकाण नाहीच, जिथे कॉल करेल तिथे भिशीचा हप्ता न्यायला त्यांचा माणूस हजर व्हायचा!

वरून दिसत असलेला हा पैशाचा प्रामाणिक परताव्याचा खेळ आतून मात्र आता अनेकांना दुखवू आणि सतावू लागला आहे. हातगाडीचालक, हॉटेलातील कामगार ते मोठमोठे शेठलोक यात गुंतून पडले आहेत. शासनाच्या नोटाबंदीच्या काळात याला खरी चाट बसली. सारा रोख स्वरूपातला पैसा गुंतला गेला. पुढे कोरोनाचा लॉकडाऊन. यामुळे तर फिरणारे चक्र थांबलेच. अडचणीत वाढ झाली. हताश होऊन भिशीचालकांच्या दारात पैसे मागायला गेल्यानंतर मात्र डोळ्यांत मिरची चटणीच्या पुड्या टाकून महिलावर्गाने देखील काहींना बेदम मारहाण केली.

काहींनी मग या गुंतलेल्या पैशाचा नादच सोडला, तर काहींनी याच भिशीचालकांनी पैशातून घेतलेल्या प्लॉटिंगमध्ये आपले गुंतलेले पैसे मोकळे होण्यासाठी त्यांनी काढेल तितक्या दरात गुंठेवारीही विकत घेऊन आपली सुटका करवून घेतल्याची उदाहरणे आहेत. या भिशी प्रकरणातून सर्वांनीच हाच बोध घ्यायला हवा. झटपट श्रीमंत होण्याच्या व खासगी व्यक्तींच्या प्रलोभनांना बळी न पडता आपला घामाचा पैसा हा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, नाहीतर या भिशीप्रमाणेच भूलभुलैया झाल्यानंतर ‘झोलझाल है रे भैया, सब झोलझाल है’ असेच रिकाम्या हाताने म्हणावे लागत बसावे लागेल, हे मात्र खरे! (इंदापूर)

Back to top button