भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली : देवेंद्र फडणवीस | पुढारी

भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भाजप युतीत २५ वर्षे सडल्याचे विधान केले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले की २०१२ पर्यंत युतीचे नेते बाळासाहेब ठाकरे होते. युतीचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंचा होता. शिवसेना जन्माला येण्याआधी मुंबईत भाजपचे नगरसेवक होते. शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर लढले होते. भाषणापलीकडे शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे? तुमचं हिंदुत्व भाषणापुरतं आहे. सेनेचं हिंदुत्व फक्त कागदावरचं आहे, असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला. हिंदुत्व जगावं लागतं, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

आम्ही प्रयागराज करून दाखवलं, तुम्ही संभाजीनगर, धारशीव कधी करून दाखवणार?. आम्ही बाळासाहेबांना अभिमानानं अभिवादन करतो. पण असं ट्विट राहुल प्रियांका गांधी यांनी केलं का? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. भाजप महाराष्ट्रात वेगळं लढूनदेखील एक नंबरचा पक्ष बनवून दाखवेल. आमच्यासोबत असताना शिवसेना एक नंबरला होती. आमची साथ सोडल्यानंतर ती चौथ्या क्रमांकावर गेली, असेही फडणवीस म्हणाले.

उत्तर प्रदेशातील सेनेच्या अपयशावर फडणवीसांनी बोट ठेवलं. शिवसेनेची लाट असताना उत्तर प्रदेशात १८० पैकी १७९ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलं होतं, अशीही आठवण त्यांनी करून दिली.

Back to top button