खडकवासला: धायरी येथे महापालिकेच्या टँकरचालकांची मनमानी सुरू आहे. हे टँकर मोफत असताना टँकरचालक नागरिकांकडून दोनशे ते पाचशे रुपये उकळत आहेत. पैसे न दिल्यास चालक टँकर माघारी घेऊन जातात. त्यामुळे रहिवाशांना खासगी टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Latest Pune News)
धायरी परिसरातील पन्नास हजारांहून अधिक रहिवाशांना बाराही महिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मोफत टँकर सुरू केले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने 48 कोटी रुपयांचा ठेका कंत्राटदाराना दिला आहे. असे असताना धायरी भागात टँकरचालक मनमानीपणे नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे उकळत असल्याची तक्रार आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर आणि नागरिकांनी केली आहे.
नियमितपणे टँकरने पाणीपुरवठा न करणाऱ्या, तसेच पैसे घेणाऱ्या टँकर चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसेच संबंधित ठेकेदाराचे टेंडर तातडीने रद्द करण्यात यावे; अन्यथा तीव आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे.
धायरी, अंबाई दरा, धनगरवस्ती, लायगुडेवस्ती, बेनकरवस्ती परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने ठेकेदार नेमले आहेत. या भागात दररोज पाणीपुरवठा करणारे टँकरचालक नागरिकांकडून 200 रुपये प्रति टँकर अतिरिक्त घेतात. पैसे दिले नाही, तर पुढच्या वेळेस टँकर वेळेवर येत नाही किंवा टँकर पाठवत नाही. पैशांसाठी चालकांकडून अडवणूक केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
बेनकर म्हणाले की, याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दखल घेतली जात नाही. नागरिकांची आर्थिक लूट करणारा ठेकेदार महापालिकेला जुमानत नाही. बारा दिवसांनी एक टँकर मिळतो. त्यासाठी दोनशे रुपये दिले नाही, तर चालक टँकर देत नाही. त्यामुळे अनेक महिन्यांपासून नागरिकांची खुलेआम लूट सुरू आहे.
नागरिकांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ धायरी गावात नियमितपणे पुरेशा प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्यात केला जात नाही. याबाबत त्रस्त नागरिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. मात्र महापालिकेचे टँकर येत नाही. त्यामुळे दोन अडीच हजार रुपये देऊन नागरिकांना नाईलाजाने खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहेत. महापालिकेने दररोज टँकर द्यावेत, नागरिकांची अर्थिक लूट बंद करावी, तसेच टँकर ’मोफत पाणी’ असे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेच्या टँकरचालकांनी पैशाची मागणी केली, तरी त्यांना नागरिकांनी पैसे देऊ नयेत, अशा सूचना वेळोवेळी केल्या जात आहेत. टँकरचालक पैसे घेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास त्यांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना नोटीसही दिल्या आहेत.अक्षय गावित, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका