

पुणे: पुणेकरांच्या मागचे रस्तेखोदाईचे शुक्लकाष्ठ अद्याप संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरात रस्त्यांची खोदाई सुरू आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच आता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पासाठी आणखी 500 किलोमीटरची नव्या खोदाई केली जाणार आहे. परिणामी, दोन्ही प्रकल्प मिळून सुमारे एक हजार किलोमीटर खोदाई होणार असून, नागरिकांना आणखी काही वर्षे रस्त्यांच्या खोदाईचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. (Latest Pune News)
महापालिकेकडून अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन प्रणाली उभारली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण शहराचे डिजिटल ट्विन मॉडेल तयार केले जाणार असून, त्याचे काम महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाप्रीत) या कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी कंपनीकडून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही आणि महाप्रीत या दोन्ही प्रकल्पांत दुबार खोदाई होऊ नये, यासाठी महापालिकेने संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेतली होती.
त्या वेळी 125 किलोमीटर अंतराच्या केबलखोदाईचे समन्वयाने काम करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, प्रत्यक्षात तो निर्णय राबविला गेला नाही. दोन्ही कंपन्यांतील समन्वयाच्या अभावामुळे ’महाप्रीत’ने काही भागांत ओव्हरहेड केबल टाकल्या, तर पोलिसांनी स्वतंत्रपणे भूमिगत केबल बसवल्या. परिणामी, महाप्रीतला आता पुन्हा स्वतंत्र खोदाई करून केबल भूमिगत टाकावी लागणार आहे.
महाप्रीत कंपनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर केबल बसवण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्या भागात खोदाईस परवानगी नसल्याने कंपनीने महापालिकेच्या पथदिव्यांवरून केबल टाकली. विद्युत विभागाने हे काम डक्टमधून करण्यास सांगितले, परंतु कंपनीकडून ‘लवकरच भूमिगत केबल टाकायच्या असल्याने डक्ट वापरणे शक्य नाही’ असे सांगण्यात आले. त्यामुळे डक्ट असूनही पुन्हा खोदाई करण्याची वेळ आली आहे.
महाप्रीत कंपनी ओव्हरहेड केबल टाकत आहे; मात्र, प्रकल्पानुसार ती भूमिगत असणे आवश्यक आहे. ओव्हरहेड केबल नंतर भूमिगत केली जाणार असून, त्यासाठी पुन्हा खोदाई करावी लागेल. पोलिस आणि महाप्रीत यांनी संयुक्त खोदाई का केली नाही, याची चौकशी केली जाईल.
पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका