

पुणे: दिवाळीच्या लगबगीत आणि प्रवाशांच्या गर्दीत पुणे रेल्वे स्थानकावर एक सहा वर्षांचा चिमुकला हरवला. गर्दीत शोधूनही मुलगा सापडेना. अखेर मुलगा हरवला अन् आपल्यापासून कायमचा दूर गेला, या भीतीने सैरभैर झालेल्या आई-वडिलांनी गस्तीवर तैनात असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाशी संपर्क साधला. गस्तीवरील निरीक्षकांनी तत्परता दाखवत सर्व यंत्रणा कामाला लावत अवघ्या 15 मिनिटांत मुलाला शोधून काढले. रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नामुळे हरवलेला पोटचा गोळा परत मिळताच पालकांनी एकच हंबरडा फोडला. (Latest Pune News)
पुणे रेल्वे स्थानकावर ही घटना 19 ऑक्टोबरच्या रात्री, साडेअकराच्या सुमारास घडली. मेहबूबनगर (तेलंगणा) येथील रवी खेतावर, पत्नी पूजा आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा अजय कन्याकुमारी एक्सप्रेसने निघाले होते. गाडी येईपर्यंत ते पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील एस्केलेटरजवळ उभे होते. रवी खेतावर तिकीट काढण्यासाठी गेले असता, सहा वर्षांचा चिमुकला अजय अचानक गर्दीत हरवला. अजय हरवल्याचे लक्षात येताच आई पूजा यांचा गोंधळ उडाला. तिकीट काढून आल्यावर रवी यांना ही माहिती मिळाली अन् दोघेही प्लॅटफॉर्मवर ढसाढसा रडू लागले. रडतच ते मुलाचा शोध घेत होते. हे स्थानकावर रात्रीच्या गस्तीवर असलेले आरपीएफचे निरीक्षक सुधीर कुमार मिश्रा आणि उप-निरीक्षक एस.सी. शर्मा यांना या घटनेची माहिती मिळाली. त्याची माहिती मिळताच त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावत, क्षणाचाही विलंब न करता तातडीने शोधमोहीम सुरू केली.
उप-निरीक्षक एस.के. शर्मा यांनी सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश देत मुलाचा फोटो तत्काळ आरपीएफ पुणेच्या व्हॉट्सॲप ग््रुापवर शेअर केला. निरीक्षक प्रभाकर तिवारी, उप-निरीक्षक एस.के. शर्मा, सहा. उप-निरीक्षक किशन सिंह आणि ड्युटीवरील आरक्षक संजय चौधरी यांच्यासह संपूर्ण स्टाफने वेगाने प्लॅटफॉर्मवर स्वत: उतरून शोध सुरू केला. अन् आरपीएफच्या सामूहिक प्रयत्नांना अखेर यश आले आणि केवळ 15 मिनिटांच्या आत चिमुकला अजय सुखरूप सापडला.
आरक्षक संजय चौधरी यांनी त्याला शोधून आरपीएफ ठाण्यात आणले. अजयला सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आरपीएफ ठाण्यात अजयला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पालकांनीही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वात प्राधान्य असते. चिमुकला अजय हरवल्याचे कळताच आमच्या टीमने कोणताही वेळ न घालवता तातडीने कार्यवाही केली. सीसीटीव्ही फुटेजचा वापर आणि टीममधील जलद समन्वयामुळे आम्ही त्याला कमी वेळात शोधू शकलो. मुलाला त्याच्या पालकांकडे सुखरूप सोपवताना आम्हाला खूप समाधान वाटले. प्रत्येक प्रवाशाची सुरक्षितता हीच आमची खरी दिवाळी आहे.
सुनील यादव, आरपीएफ निरीक्षक, पुणे रेल्वे स्थानक