

पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यात 60 खासगी दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या सहा महिन्यांत ही कार्यालये सुरू होणार आहेत. तसेच, पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई या शहरात कार्यालये सुरू होणार आहेत. दरम्यान, जादा 6 हजार रुपये देऊन ग्राहकांना दस्तनोंदणी करता येणार आहे. (Latest Pune News)
राज्य शासनाने दस्तनोंदणीची सुविधा अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात 60 खासगी कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या कार्यालयांमधून पासपोर्ट कार्यालयात देण्यात येणाऱ्या सुविधा मिळणार आहेत. या सुविधा देताना नागरिकांकडून अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क आता जास्तीत जास्त 6 हजार रुपये आकारण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. कमीत कमी दर आकारणाऱ्या संस्थेला हे काम देण्यात येणार आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.
राज्यात 60 कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. विभागाने जास्तीत जास्त 6 हजार रुपये आकारण्याची मुभा दिली आहे. त्यापेक्षा कमी दराची निविदा स्वीकारण्यात येईल.
अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे
कोणत्या सुविधा मिळणार?
या खासगी दस्तनोंदणी कार्यालयांमधून बैठकव्यवस्था, एसी, चहापानाचा समावेश आहे. शहरांमधील ग्राहक अशा सुविधांच्या मोबदल्यात अतिरिक्त पैसे देण्यास अनुकूल असतात. त्यामुळे सुरुवातीला पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर या सहा मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा देणारी 30 कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
काम मिळालेल्या संस्था पुढील सहा महिन्यांत कामे पूर्ण करून कार्यालये सुरू करणार आहेत. मोठ्या शहरांमधील कार्यालये सुरू झाल्यानंतर त्यापुढील दीड वर्षात ही कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
या कार्यालयांत नोंदविण्यात येणाऱ्या दस्तांमधून राज्य सरकारला नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काच्या रकमेसह किमान सहा हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क मिळणार आहे.
नोंदणीसाठी एक दुय्यम निबंधक आणि एक कारकून असे दोन सरकारी कर्मचारी असतील.