पुणे: पुण्यात पुढील वर्षी राष्ट्रीय पातळीवरील ’पुणे ग््रॉंड चॅलेंज’ ही सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी शहरातील व जिल्ह्यातील मिळून एकूण 75 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. चार टप्यांत ही कामे केली जाणार असून, याला सुरुवात झाली आहे. नव्याने रस्ते तयार करण्यासाठी जुने रस्ते खरवडण्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे रस्ते धोकादायक झाले असून, यावरून जाताना अपघाताची शक्यता असल्याने वाहने चालवताना काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पथ विभागाने केले आहे. (Latest Pune News)
येत्या 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत पुणे शहरात जागतिक दर्जाची सायकल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील अनेक सायकलपटू सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने शहरातील सायकलिंग मार्गांचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. तब्बल 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ही स्पर्धा होणार आहे. या मार्गांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेच्या पथ विभागाने रस्त्यांंची कामे नव्याने करण्यास सुरुवात केली आहे. या सायकल स्पर्धेसाठी जागतिक स्पर्धेच्या मानकांनुसार रस्ते असायला हवे, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते खरवडणे व त्यानंतर त्याचे पुन्हा नव्याने डांबरीकरणाचे काम सध्या शहरात सुरू आहे.
सध्या, मुकुंदनगर, बाणेर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता या ठिकाणी रस्त्याचे कामे सुरू करण्यात आली आहेत. येथील रस्ते खरवडल्याने हे रस्ते वाहन चालकांना विशेषत: दुचाकी चालकांसाठी धोकादायक झाले आहेत. या रस्त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याच्या किरकोळ घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे अशा रस्त्यावरून वाहने चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बाबत पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले की, ’सध्या काम सुरू असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांनी सुरक्षितपणे आणि जपून वाहने चालवावीत. काही ठिकाणी अत्यंत अल्पकाळासाठी असुविधा निर्माण होऊ शकते; मात्र ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पुण्याला सायकलिंगच्या नकाशावर स्थान देणारी ठरेल. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन पावसकर यांनी केले आहे.
पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेसाठी रस्ते विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार दर्जेदार रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. मुकुंदनगर, बाणेर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असून, या कामांमध्ये स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते रुंदीकरण, डांबरीकरण, गतिरोधक काढणे आणि ड्रेनेज चेंबर्सची दुरुस्ती केली जाणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
अनिरुद्ध पावसकर, विभागप्रमुख, पथ विभाग. महापालिका
महत्त्वाचे मुद्दे
सायकलिंग स्पर्धेसाठी रस्ते
विकासाचा सर्वंकष आराखडा तयार.
दर्जेदार रस्त्यांची निर्मिती.
75 किमी रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च
सुमारे 123 कोटी.
रस्ते रुंदीकरण, डांबरीकरण,
गतिरोधक काढणे आणि ड्रेनेज चेंबर्सची दुरुस्तीची कामे केली जाणार.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या मानकांनुसार, रस्त्यांचे होणार डांबरीकरण.
स्पर्धेच्या मार्गावरील सुमारे 200 गतिरोधक आणि 400 ड्रेनेज चेंबर्सची दुरुस्ती.
चार टप्प्यांत होणार कामे.