BJP Pudhari
पुणे

Pune BJP Candidate Interview: चार ते पाच मिनिटांतच उमेदवारीची परीक्षा; भाजपचे ‘मायक्रो इंटरव्ह्यू’

काम, वर्चस्व आणि जिंकण्याची क्षमता हाच मंत्र; 125 जागांसाठी फास्ट ट्रॅक मुलाखती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पक्षनेत्यांनी तिकीट द्यावे यासाठी भाजपशी एकनिष्ठा, जनसंपर्क, लोकांमध्ये असलेली प्रतिमा व उमेदवारी मिळण्यासाठी ‌’मी कसा/कशी योग्य‌’ आहे हे पटवून देण्याकरिता अनेक इच्छुकांनी पीपीटी प्रेझेंटेशन, केलेल्या कामांची फाइल पक्षप्रमुखांसमोर सादर करत प्रभागात केलेल्या कामांचा पाढा वाचला. मात्र, मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने प्रत्येक उमेदवाराला केवळ चार ते पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला. भाजपच्या या ‌’फास्ट ट्रॅक इंटरव्ह्यू‌’मुळे अनेक इच्छुकांची धाकधूक वाढल्याचे दिसून आले. काही जण प्रश्नांच्या सरबत्तीने गोंधळले, तर काहींनी नेमकेपणाने, आत्मविश्वासाने उत्तरे देत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले, तर काही ‌’उमेदवारी मिळणारच‌’ या आत्मविश्वासात असल्याचे दिसून आले.

पुण्यात भाजपची उमेदवारी देण्यासाठी भाजप पदाधिकारी व स्थानिक नेत्यांची मोठी दमछाक होणार आहे. पुण्यातील 41 प्रभागांसाठी तब्बल 2,500 हजार इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरले. या इच्छुकांच्या मुलाखती भाजपच्या कार्यालयात शनिवारी पार पडल्या. रविवारी देखील या मुलाखती होणार आहेत. भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले या तिघांनी या मुलाखती घेतल्या. धीरज घाटे यांच्याकडे तीन, गणेश बीडकर यांच्याकडे तीन आणि श्रीनाथ भिमाले यांनी दोन अशा पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या. या मुलाखती घेताना त्या-त्या प्रभागातील माहिती, उमेदवारांची इच्छाशक्ती, आधी केलेली कामे आणि सामाजिक वर्चस्व आदींची माहिती विचारण्यात आली. यंदा 125 उमेदवार निवडून आणण्याची तयारी भाजपने केली असून, सक्षम उमेदवारासाठी मुलाखती घेण्यात आल्या.

या मुलाखती म्हणजे केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, प्रत्येक इच्छुकाच्या राजकीय ताकदीची, कामगिरीची आणि इच्छाशक्तीची कसोटी ठरली, असेच चित्र दिवसभर पाहायला मिळाले. अनेक इच्छुकांनी आपल्या कामांचा पाढा वाचताना ‌’मी काय केलं‌’ यावर भर दिला, तर काहींनी थेट प्रेझेंटेशन सादर करत आकडेवारी, छायाचित्रे आणि कामांचे दाखले दिले. काही इच्छुकांनी फाइल्स, कागदपत्रे आणि कामांच्या अहवालांसह मुलाखतीला हजेरी लावली होती. मात्र, इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा मोठी असल्याने मुलाखतीची वेळ खूपच कमी ठेवली. प्रत्येक इच्छुकाला अवघ्या चार ते पाच मिनिटांतच आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली. भाजपच्या या मुलाखतीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले.

काही इच्छुकांच्या चेहऱ्यावर उमेदवारी जवळ

आल्याचा आत्मविश्वास झळकत होता, तर काहीजण ‌’आपलं काही चुकलं तर नाही ना?‌’ या चिंतेत दिसत होते. चार मिनिटांत राजकीय भविष्य ठरणार का? असा प्रश्न अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. भाजपकडून यावेळी स्पष्ट संकेत देण्यात आले की, केवळ जुन्या ओळखी, पदे किंवा गटबाजीच्या जोरावर उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांत उमेदवारीच्या चर्चांना आणि राजकीय हालचालींना आणखी वेग येणार, हे निश्चित आहे.

आमच्या मुलाखती सर्वांसमोर नको

भाजपसह पक्षाबाहेरील काही इच्छुकांनी अर्ज भरला आहे. शनिवारी व रविवारी या दोन दिवस होणाऱ्या या मुलाखतीत पक्षाबाहेरील माजी नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांनी भाजप नेत्यांकडे आमच्या मुलाखती सर्वांसमोर नको, अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग््रेास, कॉंग््रेास, शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्षातील अनेक जण भाजपच्या वाटेवर आहेत. यातील काही इच्छुकांचा प्रवेश पुढील आठवड्यात वरिष्ठांच्या सूचनेनुसार करण्यात येईल, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने शनिवारी आणि रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन केले. या मुलाखती घेताना उमेदवारांचा जनसंपर्क, त्यांनी केलेली कामे व त्यांची निवडून येण्याची क्षमता याचा विचार करण्यात आला. त्यानुसार त्यांना तिकीट दिले जाणार आहे.
धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

उमेदवारांना पुन्हा संधी

पुण्यात 2017 मध्ये भाजपचे 98 नगरसेवक होते. त्यात आता शिवसेनेच्या 5 उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आता 125 नगरसेवक निवडून आणण्याच्या तयारीत आहे. 2017 मध्ये काहीच मतांनी पराभूत झालेल्यांना पुन्हा संधी देण्याच्या तयारीतही भाजप दिसत आहे.

प्रभागनिहाय आलेले अर्ज

भाजपकडे एकूण 2,500 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 29 मध्ये सर्वाधिक 90 अर्ज आले. प्रभाग क्रमांक 28 मध्ये 60, तर प्रभाग क्रमांक 24 मध्ये 58 अर्ज मिळाले आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रभाग क्रमांक 6 आणि 14 मधून प्रत्येकी 15 अर्ज प्राप्त झाले आहेत. बहुतांश प्रभागात अर्जांची संख्या 30 पेक्षा अधिक आहे.

मुलाखत घेताना उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावरून ते निवडणूक लढण्यास सक्षम आहेत की नाही याचा अभ्यास करण्यात आला. ज्यांनी पक्षसंघटनेची कामे केली व पक्षाला वेळ दिला आहे, अशांवर अन्याय न करता त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे.
गणेश बीडकर, माजी सभागृह नेते व महापालिका निवडणूक प्रभारी, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT