

पुणे : ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या एका व्यक्तीवर तलवार, कोयता आणि पिस्तुलाच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या सराईत आरोपीला अटक करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले आहे. मागील तीन वर्षांपासून हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. बंडगार्डन पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे (वय २६, रा. वडारवाडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तुषार हनुमंत हंबीर (वय ३५, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली होती. हंबीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या एका गुन्ह्यात तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
चालता येत नसल्याने २५ ऑगस्ट २०२२ रोजी त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी मुख्यालयाकडून पोलिस गार्डची नेमणूक करण्यात आली होती. असे असतानाही ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर पाच आरोपींनी प्रवेश करून हंबीरला जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व कोयत्याने हल्ला केला होता.
फिर्यादीला वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या पोलिस गार्ड तसेच फिर्यादीच्या मेहुण्याच्या हातावर वार करून त्यांना जखमी करण्यात आले. याचवेळी एका आरोपीने पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात १२ आरोपी निष्पन्न करून त्यापैकी ११ जणांना अटक केली होती. सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, गुन्हा घडल्यापासून रोहित ऊर्फ तम्मा धोत्रे हा फरार होता.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता शिंदे अल्फोन्सो आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान, आरोपी केसनंद परिसरात असल्याची माहिती अंमलदार ज्ञानेश्वर बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून धोत्रेला ताब्यात घेतले.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या पथकाने केली.