

पुणे : प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने कडक उपाययोजना लागू केली आहे. पीएमपीच्या बसगाड्यांचे चाक फिरण्यापूर्वी म्हणजेच प्रत्येक चालकाला त्यांची ड्युटी सुरू करण्यापूर्वी ब्रेथ ॲनालायझर तपासणीसाठी फुंकर मारणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार ताफ्यातील सर्व डेपोंमध्ये तपासणीही सुरू केली आहे.
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पीएमपीचे चालक मद्यपान करून बस चालवणार नाहीत, याची खात्री केली जाणार आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण, पीएमपी दररोज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लाखो प्रवाशांची वाहतूक करते.
चालकांना त्यांच्या कामाच्या शिफ्टला सुरुवात करण्यापूर्वी लगेचच डेपोमध्ये किंवा नेमून दिलेल्या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझर तपासणी करून घ्यावी लागणार आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी होईल आणि रस्त्यावरील अपघात टाळण्यास मदत होईल, त्यामुळे प्रवाशांचा पीएमपीवरील विश्वास अधिक वाढेल.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. पीएमपीच्या या निर्णयामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पीएमपी प्रशासनाला आहे.