

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक ब्लॉक करण्यात आले होते. मात्र, सत्र पूर्तता कालावधी संपलेल्या N+2 च्या निकषात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक संबंधित महाविद्यालयांना तपासणीसाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर येत्या सोमवारी किंवा मंगळवारी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या कालावधीमध्ये पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु, कालावधी संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठातर्फे या विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी उपलब्ध करून दिली जाते. दीड महिन्यापूर्वी विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये तसेच व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मात्र, तरीही या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. विद्यापीठ केव्हा परिपत्रक प्रसिद्ध करणार आणि विद्यार्थ्यांना केव्हा परीक्षा अर्ज भरता येणार? याबाबत उत्सुकता होती. अखेर विद्यापीठाने यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन पीआरएन ब्लॉक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व संबंधित महाविद्यालयांना पीआरएन क्रमांक पाठविले आहेत. त्याचप्रमाणे सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबत सूचना देऊन विद्यार्थ्यांचे पीआरएन क्रमांक पडताळणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील सत्र पूर्तता संपलेल्या केवळ N+2 या निकषात बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच, हा कालावधी पूर्ण करून एक वर्ष झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाईल. परंतु, N + 2 +1 याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसंदर्भात विद्यापीठाकडून केव्हा निर्णय घेणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. परंतु, तरीदेखील काही कारणांमुळे पदवीपासून वंचित राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आता राहिलेले एक किंवा दोन विषय उत्तीर्ण होऊन आपली पदवी पूर्ण करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.