Tarapur MIDC Pudhari
पालघर

Tarapur MIDC: तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायूगळती; औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न

भगेरिया केमिकल कंपनीतील ओलियम गळतीनंतर दोन हजार नागरिकांना हलवले; वारंवार दुर्घटनांमुळे ‘भोपाळसारख्या’ संकटाची भीती

पुढारी वृत्तसेवा

बोईसर : संदीप जाधव

देशातील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा धोक्याच्या वाटेवर वाटचाल करीत आहे. सोमवारी भगेरिया केमिकल कंपनीत झालेल्या ओलियम वायूगळतीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असुन या घटनेनंतर सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक व कामगारांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मात्र वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे तारापूर एमआयडीसीच्या सुरक्षा धोक्यात आली असून भोपाळ दुर्घटनेच्या मार्गावर तर जाणार नाही ना ?अशी भिती व्यक्त होत आहे.

1984 साली भोपाळ येथे झालेल्या वायूदुर्घटनेने हजारो निष्पापांचे जीव घेतले होते. त्या भीषण घटनेची आठवण ताजी करणारी परिस्थिती तारापूरमध्ये वारंवार होणाऱ्या वायूगळती,स्फॉट आदीमुळे निर्माण झाली आहे. या सर्वांमुळे प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची भूमिका मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

भगेरिया केमिकल कंपनीत ओलियम वायूगळती घटना घडल्याने काही काळासाठी हवेत तीव्र आम्लीय वास दरवळत होता. अनेकांना डोळ्यांत पाणी येणे, त्वचेवर जळजळ जाणवणे असे त्रास झाले. अग्निशमन दल, पोलीस व आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली; मात्र या घटनेने औद्योगिक सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.प्रत्येक घटनेनंतर चौकशी समित्या, अहवाल, दंडात्मक कारवाईची घोषणा होते; पण प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा का दिसत नाही? प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासन केवळ कागदी कारवाईत गुंतले आहे का, असा सवाल उपस्थित होतो आहे.

तारापूर एमआयडीसी हा देशातील अत्यंत संवेदनशील रासायनिक औद्योगिक पट्टा मानला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर आम्ल, वायू आणि धोकादायक रसायनांचा साठा केला जातो. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सक्षम आहे का? नागरिकांना तातडीची सूचना देणारी यंत्रणा कार्यरत आहे का? स्थानिक रुग्णालये अशा दुर्घटनांसाठी सज्ज आहेत का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. औद्योगिक क्षेत्रात केमिकल माफिया, भंगार माफिया आणि युरिया माफिया यांसारख्या जाळ्यांची छुप्या पद्धतीने घुसखोरी असल्याच्या चर्चा उघडपणे होत आहेत. या जाळ्यांमुळे अनेक अनधिकृत धंद्यांना आडून पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर केला जातो. एमआयडीसी परिसरातून लाखोंची कथित वसुली होत असल्याच्या चर्चांमुळे अधिकारी वर्ग सक्रिय कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही वारंवार पुढे येतो. परिणामी, त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य नागरिक आणि कामगारांना भोगावे लागत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

वर्ष 2025-2026 मधील धोकादायक घटना

तारापूर औद्योगिक वसाहतीत गेल्या एका वर्षात घडलेल्या वायुगळतींची मालिका चिंताजनक आहे

19 मे 2025

कॅमलिन फाईन सायन्स लिमिटेड या युनिटमध्ये डायमिथिल सल्फेट (डीएमएस) वायूगळती झाली होती. यावेळी किमान 13 कामगारांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास अशा तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सुदैवाने जीवितहानी टळली होती परंतु कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

13 जुलै 2025

तारापूर औद्योगिक वसाहतीतील आरती ड्रग्स लिमिटेड या रासायनिक कंपनीत ब्रोमिन वायू गळतीची घटना घडली होती.उत्पादन प्रक्रियेदरम्यान ब्रोमिन वायू बाहेर पडल्याने परिसरात पिवळसर धूर पसरला होता. काही कर्मचाऱ्यांना डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचा त्रास जाणवला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती; मात्र ही घटना औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली गेली आहे.

21 ऑगस्ट 2025

मेडली फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीत कारखान्यात अल्बेंडोझोल या उत्पादनाची प्रक्रिया सुरू असताना अचानक विषारी वायूगळती झाली. या वायूच्या संपर्कात आल्याने सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. तात्काळ सर्वांना बोईसर येथील खाजगी शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान कमलेश यादव, कल्पेश राऊत, धीरज प्रजापती आणि बंगाली ठाकूर या चौघांचा मृत्यू झाला होता. यावेळी सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींचा मुद्दा पुढे आला होता, मात्र त्यानंतर ठोस सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही.

8 सप्टेंबर 2025

आरती ड्रग्स लिमिटेड या कंपनीत हायड्रोक्लोरिक आम्ल (एचसीएल) गळती झाली होती.तारापूर एमआयडीसीतील या औषधनिर्मिती कंपनीमध्ये रासायनिक टाकी/पाईपलाईनमधून हायड्रोक्लोरिक आम्लाची गळती झाल्याची घटना घडली होती. ही गळती अचानक झाल्याने कारखान्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

आम्लाचा तीव्र वास परिसरात पसरल्याने काही कर्मचाऱ्यांना डोकेदुखी, घशात खवखव आणि श्वसनाचा त्रास जाणवला होता त्यांना तातडीने सुरक्षाविभागाने संबंधित विभाग रिकामा करून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाले नाहीत.

25 फेब्रुवारी 2026

विनायक केमेक्स या कंपनीत क्लोरीन वायूगळतीची घटना घडली होती. सुदैवाने प्राणहानी झाली नाही; मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT