

पोलादपूर : समीर बुटाला
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ 2 मार्च रोजी सायंकाळी 4:45 च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एका भरधाव कारवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हा अपघात खेड हद्दीत झाला. या अपघातानंतर काही तास वाहतूक विस्कळीत झाली होती. सदरची कार शिमगाउत्सवासाठी कोकणात जात होती. शिवम सिंग हा आपल्या ताब्यातील कार मुंबई ते चिपळूण घेऊन जात असताना कशेडी बोगदा च्या अलीकडे आले असता गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दिशाद विनोद शिंदे, वय 26, मीरा रोड हा मयत झाला. या अपघाताची माहिती मिळताच खेड तालुक्यातील भरणे नाका ब्रिजखाली 24 तास सेवेत असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी
महाराज संस्थान (नाणिज धाम) यांची मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी प्रसंगावधान राखत जखमींना प्राथमिक उपचार दिले आणि तातडीने खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने, रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी दिशाद शिंदेला मृत घोषित केले.
दुसऱ्या शिवम सिंग या जखमीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
कशेडी बोगदा परिसरात यापूर्वीही अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी या भागात वेगमार्यादा पाळावी आणि वाहन चालवताना विशेष खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी अपघात मृत्यूची नोंद करण्यात आला असून चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.