पालघर

Municipal library slab collapsed: दोन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या वसईतील महापालिका वाचनालयाचा स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

या घटनेमुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

विरार : वसई पश्चिमेतील अंबाडी रोड परिसरात असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या वाचनालयात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी विद्यार्थी किंवा कर्मचारी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने दुरुस्तीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अंबाडी रोडवरील हे महापालिकेचे वाचनालय शहरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अभ्यासकेंद्र मानले जाते. स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यास तसेच विविध संदर्भग्रंथांच्या वाचनासाठी दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी येथे येत असतात. त्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येताच विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

महापालिकेकडून काही महिन्यांपूर्वी वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर दुरुस्ती आणि डागडुजीची कामे करण्यात आली होती. या कामानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी संबंधित मजल्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर इतक्या कमी कालावधीतच स्लॅब कोसळल्याने संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात निष्काळजीपणा झाला का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

घटनेनंतर महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत कोसळलेल्या भागाची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित मजल्यावरील प्रवेश तात्पुरता बंद करण्यात आला असून इमारतीच्या इतर भागांचीही तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी संपूर्ण इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भाजपचे नगरसेवक महेश सरवणकर यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वकल्पना न देता वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर इतक्या कमी कालावधीत स्लॅब कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित ठेकेदारावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची तांत्रिक पाहणी नेमकी कोणी केली, कामाच्या गुणवत्तेची खातरजमा कशी करण्यात आली आणि उद्घाटनापूर्वी इमारत सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्यांनी दिले, असे अनेक प्रश्नही सरवणकर यांनी उपस्थित केले आहेत. "जर ही घटना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घडली असती आणि एखादा जीव गेला असता, तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारली असती?" असा सवाल त्यांनी उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. या घटनेमुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT