

पणजी : काव्या कोळस्कर
इतिहास, संस्कृती आणि ज्ञानाचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या कृष्णदास शामा मध्यवर्ती ग्रंथालयात दुर्मीळ आणि ऐतिहासिक पुस्तकांच्या संवर्धनासाठी अत्यंत बारकाईने आणि वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. २०१३ पासून सुरू झालेल्या या विशेष संवर्धन उपक्रमांतर्गत आतापर्यंत तब्बल २५ हजार ४८४ पानांचे जतन करण्यात आले आहे.
दुर्मीळ ग्रंथ, पोथी, पुस्तके, जुनी, सरकारी आणि ऐतिहासिक कागदपत्रे आणि नाजूक पानांचे आयुष्य वाढविण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक केली जाते, संवर्धनाच्या सुरुवातीला संबंधित पुस्तकाचे संपूर्ण स्कॅनिंग करून त्याची सॉफ्ट कॉपी तयार केली जाते. त्यानंतर पुस्तकातील पाने स्वतंत्र करण्यात येतात.
पानांवरील धूळ आणि अशुद्धी दूर करण्यासाठी प्रथम ती चुन्याच्या पाण्यात बुडवली जातात. त्यानंतर डिस्टिल्ड वॉटरमध्ये स्वच्छ धुतली जातात. अतिरिक्त पाणी काढल्यानंतर पुढील रासायनिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेसाठी दोन विशेष द्रावणांचा वापर होतो. पहिल्या टप्प्यात 'ग्लूटन फ्री पेस्ट' तयार केली जाते. यासाठी विशिष्ट रासायनिक पावडरचे दोन चमचे पाण्यात मिसळून गरम केले जाते.
दुसऱ्या टप्प्यात 'सीएमसी सोल्युशन पेस्ट' तयार केली जाते. उकळत्या पाण्यात सीएमसी पावडर मिसळून हे द्रावण तयार केले जाते. नंतर विशेष प्रकारचे कापड टेबलावर अंथरले जाते. त्यावर सीएमसी द्रावण लावून जपानमधून आयात केलेले विशेष टिश्यू पेपर चिकटवले जाते. हे टिश्यू दिल्लीस्थित कंपनीमार्फत खरेदी केले जाते. त्या टिश्यूवर ग्लूटन फ्री पेस्टचा थर देण्यात येतो आणि त्यावर पुस्तकाचे पान काळजीपूर्वक चिकटवले जाते. बाइंडिंगसाठी अतिरिक्त बाजू ठेवण्यात येते. त्यानंतर पुन्हा रासायनिक पेस्ट, वरचा टिश्यू आणि अंतिम रासायनिक थर दिला जातो. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाने २४ तास सुकण्यासाठी ठेवली जातात. त्यानंतर बाईडिंग आणि कव्हर लावण्याची प्रक्रिया पार पडते. अशा प्रकारे दुर्मीळ दस्तावेज आणि ग्रंथांचे संवर्धन पूर्ण केले जाते.
कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
ग्रंथालयात ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी २०१२ पूर्वी ग्रंथालयात लॅबची स्थापना करण्यात आली. कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या वैज्ञानिक पद्धतीमुळे पुस्तकांचे आयुष्य सुमारे १०० वर्षापर्यंत वाढते. तसेच ही पुस्तके धूळ आणि कीटकांपासून सुरक्षित राहतात. शंभर वर्षांनंतर जर पुन्हा पानांचे नुकसान झाले तर हीच पुनर्प्रक्रिया करून पुस्तकांचे संरक्षण केले जाते. ज्ञानाचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचा मध्यवर्ती ग्रंथालयाद्वारे हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.