जळगाव; पुढारी वृत्तसेवा : पंकजा मुंडे : भारतीय जनता पक्षात ओबीसींची गळचेपी होत असून मुंडे भगिनींनाही अडचणी येत आहेत. यामुळे आपण त्यांना सर्वप्रथम शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. हीच आता वंजारी समाज बांधवांची भावना असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जळगांव तालुक्यातील किनोद येथे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांना पाहिजे तसे नेतृत्व भाजपकडून मिळाले नाही.
भाजपच्या पडतीच्या काळात स्व गोपीनाथ मुंडे यांनी जे काम केले त्याच्या मुलींना प्रत्येक पदासाठी संघर्ष करावा लागत आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिटे कापले. चारही बाजूंनी नजर मारल्यास भारतीय जनता पक्षात ओबीसींची गळचेपी होत आहे. ओबीसींचे खच्चीकरण होत आहे.
त्यांच्या समाजाला वाटते की शिवसेना त्यांना सन्मान देऊ शकते म्हणून त्यांच्या समाजाची मागणी आहे आमची नाही आपणच त्यांनी शिवसेनेत यावे ही पहिल्यांदा ऑफर दिली होती. आता हीच भावना वंजारी समाज बांधवांनी व्यक्त केली असल्याचे ना. पाटील म्हणाले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना पक्षात योग्य ती सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रसंगी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, कोकणातील आपत्तीच्या काळात राजकारण करता कामा नये. पूर काही कुणाचे घर पाहून येत नाही. मात्र नारायण राणे यांची स्थिती डोकं फिरलया…अशी झाल्याची टीका ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
हे ही वाचलं का?