दोन वर्षे कुठं गेलं ओ प्रशासन? आज परत आलाय! फडणवीसांवर ग्रामस्थाचा संताप | पुढारी

दोन वर्षे कुठं गेलं ओ प्रशासन? आज परत आलाय! फडणवीसांवर ग्रामस्थाचा संताप

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरकरांची महापुरापासून सुटका झालेली नाही. २०१९ च्या आठवणी अजूनही पुसल्या जात नसताना पुन्हा एकदा महापुराच्या रौद्ररुपाला सामोरे जावं लागले. यावेळी धरणातील पाणी नदी पात्रात न येऊनही कोल्हापूरकरांनी भीषण परिस्थिती अनुभवली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचा महापुराने सर्वांधिक बाधित झालेल्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. आज योगायोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पुरस्थितीची पाहणी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात तसेच शाहुपुरीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयाग चिखलीमध्ये जाऊन पाहणी केली. त्यानंतर शाहुपुरीमध्ये भेट देऊन पाहणी केली.

यावेळी फडणवीस यांना ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागले. एका ग्रामस्थाने दोन वर्षे कुठं गेलं ओ प्रशासन? असा संतप्त सवाल करत विचारणा केली. मारुती मंदिरात चर्चा सुरु असतानाच त्या ग्रामस्थाने मारुती साक्षय आमचा असे सांगत गेल्या दोन वर्षात काहीच मदत झाली नसल्याचे सांगितले.

तो ग्रामस्थ म्हणाला की, साहेब, मागच्या वेळी चंद्रकांत दादा आले होते. दादांनी पण शब्द दिला. नाही म्हणत नाही. दादा तुम्ही शब्द दिला होता याच मंदिरात याला मारुती साक्षीदार आहे. त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं प्रशासन? असा संताप या ग्रामस्थाने व्यक्त केला.

त्या ग्रामस्थाने आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून देताना सांगितले की, आश्वासनानंतर तुम्ही आम्हाला बघितलं नाही. आदित्य ठाकरे साहेब आले, त्यांनीही बघितलं नाही. कुणीच आमच्याकडे बघितलं नाही आणि आज तुम्ही परत आला आहात. आता परत तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार आणि आम्ही आमच्या कामाला. तुम्हीही तुमच्या कामाला.

परत कुणी आमच्याकडे बघणार नाही साहेब, हे मी आता तुम्हाला उघड सांगतो.  ग्रामस्थांने मनातील संताप व्यक्त केल्यानंतर काही काळ त्या ठिकाणी शांतता पसरल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री आले आणि सहा मिनिटात निघून गेले

दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री आले आणि सहा मिनिटात निघून गेले अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करता आली असती अशी प्रतिक्रिया पुरग्रस्तांनी दिली.

संतापलेल्या पूरग्रस्तांनी, तालुक्यातील मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावरही टीकेची झोड उठवली. नियोजन शुन्य दौरा झाल्याचे सांगत, या दौऱ्याची तुलना सन 2005 साली, महापूरग्रस्तांचे सांत्वन करायला आलेल्या काँग्रेसच्या सोनिया गांधी व मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दौऱ्याशी केली.

हे ही वाचलं का?

Back to top button