एअर इंडिया च्या ११५ मालमत्तांची ७३८ कोटींना विक्री : केंद्र सरकार | पुढारी

एअर इंडिया च्या ११५ मालमत्तांची ७३८ कोटींना विक्री : केंद्र सरकार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया ने गेल्या काही वर्षांत आपल्या 115 मालमत्तांची 738 कोटी रुपयांना विक्री केली असल्याची माहिती हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी गुरुवारी लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली.

कर्ज कमी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून एअर इंडियाला मालमत्तांची विक्री करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार 2015 पासून आतापर्यंत कंपनीने 115 मालमत्तांची विक्री केली आहे. याद्वारे कंपनीला 738 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही सिंग यांनी नमूद केले.

एअर इंडियाची स्थिती सुधारण्यासाठी एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम (एआयएसएएम) योजना हाती घेण्यात आली होती. त्यानुसार विविध प्रकारच्या मालमत्ता विकून कंपनी पैसा जमा करीत आहे. मार्च 2019 मधील आकडेवारीनुसार एअर इंडिया वर 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, ही योजनादेखील सध्या प्रगतिपथावर आहे. एअर इंडियाने विक्रीसाठी 112 मालमत्ता निश्चित केल्या आहेत.

यातील 106 मालमत्ता देशात आहेत तर 6 मालमत्ता विदेशात आहेत. लीज रेंटल अर्थात भाडेकराराद्वारे कंपनीला वार्षिक शंभर कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत असल्याची माहितीही सिंग यांनी दिली.

कंपनीच्या विक्रीसाठी वित्तीय निविदा मागविण्यात आल्या असून, 15 सप्टेंबरपासून निविदा येण्यास सुरुवात होणार असल्याचेीर सिंग यांनी स्पष्ट केले.

Back to top button