दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मंत्रिमंडळाने मराठवाड्यासाठी पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी देण्यासाठी १३०० कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर पश्चिमवाहिनी नार-पार नद्यांच्या खोऱ्यातील हक्काचे पाणी मिळविण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांमध्ये जलजागृतीसाठी जल परिषदेच्या वतीने देवसाने-मांजरपाडा प्रकल्प येथून जलआरक्षण यात्रेस सुरुवात केली. नार-पारच्या पाण्यावर स्थानिकांना प्रथम हक्क मिळण्यासाठी जलआरक्षण यात्रेच्या माध्यमातून बिगुल फुंकण्यात आले आहे.
संबधित बातम्या :
जल परिषद अध्यक्ष देवीदास कामडी यांनी जलआरक्षण यात्रेसाठी पुढाकार घेतला आहे. जलआरक्षण यात्रेचे संयोजन नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केले आहे. यात्रेचा शुभारंभ देवसाने सरपंच प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. पाण्याचे संवर्धन करण्याचा संदेश देत वणी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, बाऱ्हे, ननाशी आदी भागांत ही यात्रा आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती घडविणार आहे.
नाशिक जिल्ह्यात केम डोंगराच्या पायथ्याशी नार-पारसह एकूण सात नद्या उगम पावतात. तर दिंडोरी तालुक्यात दमणगंगा नदी उगम पावते. या सर्व नद्या पश्चिमवहिनी असून, दमणजवळ अरबी समुद्राला मिळतात. या नद्यांच्या खोऱ्यात प्रचंड पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात शेतीलाच काय, पण पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. अनेक गावांत महिलांना डोक्यावर हंडे घेत पायपीट करावी लागते. शासन मराठवाड्यासाठी १३०० कोटी रुपये खर्च करून त्यांची तहान भागू शकते. पेठ-सुरगाणा-दिंडोरीचे पाणी जायकवाडी प्रकल्पांना देताना स्थानिक पाण्यापासून वंचित आहेत.
मांजरपाडा प्रकल्प देवसानेत आकारास येत आहे. तसेच अनेक वळण योजनाही दिंडोरी तालुक्यात झाल्या. पण नेत्यांनी आश्वासने देऊनही स्थानिकांसाठी पाणी आरक्षण मिळू शकले नाही. पाणी आरक्षण केवळ कागदावर राहिले. अनेक कमी खर्चाचे नवीन प्रकल्प नार-पार खोऱ्यात उभे राहू शकतात. शासनाच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पण त्यावर निर्णय होत नाही. म्हणून नितीन गांगुर्डे यांनी जलआरक्षण यात्रेस सुरुवात केली आहे. भविष्यकाळात लोकसहभागातून वनराई बंधारे उभे राहावेत, जलप्रकल्पांमध्ये पाणी आरक्षण मिळण्यासाठी जलजागर अभियान नार-पार-दमणगंगा गोदावरी खोऱ्यात सुरू करण्यात आलेले आहे.
हेही वाचा :