Nashik Ganeshotsav : विसर्जन मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश | पुढारी

Nashik Ganeshotsav : विसर्जन मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे तसेच या मार्गाची डागडुजी, स्वच्छता करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. गोदाघाट, रामकुंड आदी मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करतानाच नाशिककरांनी जास्तीत जास्त मूर्ती दान कराव्यात, असे आवाहनही डॉ. करंजकर यांनी केले आहे. (Nashik Ganeshotsav )

संबधित बातम्या :

येत्या २८ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने यापूर्वीच २७ नैसर्गिक स्थळे तर ५८ कृत्रिम तलावांची यादी जाहीर केली आहे. जुन्या नाशकातील वाकडी बारव येथून गणेश विसर्जनाच्या पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात होते. त्यामुळे डॉ. करंजकर यांनी गुरुवारी (दि.२१) या मिरवणूक मार्गाची पाहणी केली. वाकडी बारव, फाळके रोड, दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा परिसर, मेन रोड, धुमाळ पॉइंट, एमजी रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, रामकुंड परिसर, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण या मार्गाची आयुक्तांनी पाहणी करत मार्गावरील अडचणी समजून घेतल्या. मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, रस्त्यांवर खड्डेही पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर असलेले अतिक्रमण तसेच या मार्गावरील रस्त्याची डागडुजी आणि स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्त करंजकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त नितीन नेर यांसह कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, संदेश शिंदे, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, पंचवटी विभागीय अधिकारी योगेश रकटे, विद्युत विभागाचे उपअभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता नितीन भामरे आदी या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.

अनधिकृत फलक हटवा

शहरातील प्रमुख रस्त्यांवर महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शक कमानींवरील अनधिकृत फलक तातडीने हटविण्याचे आदेश आयुक्त डॉ. करंजकर यांनी यावेळी दिले. या फलकांमुळे शहराला बकालावस्था प्राप्त होत असल्यामुळे अनधिकृत फलक उभारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button