कोल्हापूर : दसऱ्याचा मार्ग होणार हेरिटेज स्ट्रीट

कोल्हापूर : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव राज्यभर प्रसिद्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या वतीने आता हा दसरा देशभर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत दसऱ्याचा मार्ग हेरिटेज स्ट्रीट म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत या मार्गावर हेरिटेज लूक असलेले १६५ खांब उभारले जाणार आहेत. तसेच सरकारी व खासगी अशा १५ इमारती आकर्षक विद्युत रोषणाईने झळकणार आहेत. विद्युत खांब व इमारतीवरील रोषणाई कायमस्वरूपी केली जाणार आहे.
जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणामधून कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड, बिंदू
चौक, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक आणि जयंती नाला रोड येथे डेकोरेटिव्ह विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. त्याबरोबरच भवानी मंडप ते न्यू पॅलेस, बिंदू चौक, जुने कोर्ट, सीपीआर, टाऊन हॉलसह इतर सरकारी ९ इमारती आणि खासगी ६ इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शाहूकालीन इमारतींचा यात समावेश आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटकांनाही या विद्युत रोषणाईची भुरळ पडावी आणि पर्यटनात वाढ व्हावी, यासाठी विद्युत खांब व रोषणाई करण्यात येणार आहे