पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा पहिला सामना नेपाळ विरुद्ध झाला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळचा २३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघ प्रथमच सहभागी झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ केवळ १७९ धावा करू शकला. भारताकडून यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली.
संबंधित बातम्या :
नेपाळविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताचा कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वालने ४९ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०० धावा केल्या. त्याच्याशिवाय रिंकू सिंगने अखेरपर्यंत शानदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या १५ चेंडूत ३७ धावा केल्या. भारतीय संघाने १३ षटकांनंतर ३ विकेट गमावल्या होत्या. ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा (२ धावा) आणि जितेश शर्मा (५ धावा) यांनी भारताकडून चांगली कामगिरी केली नाही. ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २५ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने नेपाळसमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले. नेपाळकडून दीपेंद्र सिंगने दोन बळी घेतले. सोमपाल कामी आणि संदीप लामिछाने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात नेपाळचा संघ नऊ गडी गमावून केवळ १७९ धावा करू शकला. विजयासाठी २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कुशल भुर्तेलने नेपाळची चांगली सुरुवात केली. मात्र साई किशोरने कुशल भुर्तेलची विकेट घेतली. दीपेंद्र सिंगने सर्वाधिक ३२ धावा केल्या. संदीप जोरा आणि कुशल मल्लाने २९ धावांचे, कुशल भुरटेलने २८ आणि करणने १८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवी बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीपला दोन आणि आर साई किशोरला एक विकेट मिळाली.
भारताची प्लेईंग ११
रुतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आर साई किशोर, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग.
कुशल भुरटेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), संदीप जोरा, गुलसन झा, रोहित पौडेल (कर्णधार), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, संदीप लामिछाने.
दरम्यान, चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. भारताने आतापर्यंत एकूण ६१ पदके जिंकली असून त्यात १३ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. आज १० व्या दिवशीही अनेक स्पर्धांमध्ये पदकांची अपेक्षा आहे.
हेही वाचा :